युकी भांब्रीचा फ्रान्सच्या माँफिसला धक्का

पीटीआय
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

निकाल
युकी भांब्री वि.वि.  गेल माँफिस ६-३, ४-६, ७-५

वॉशिंग्टन - भारताचा एकेरीतील प्रतिभासंपन्न टेनिसपटू युकी भांब्रीने कारकिर्दीतील सर्वोत्तम विजय संपादन केला. सिटी ओपन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत त्याने गतविजेत्या गेल माँफिसचा ६-३, ४-६, ७-५ असा पराभव केला. माँफिस जागतिक क्रमवारीत २२व्या स्थानावर आहे.

दुखापतीमुळे २००व्या क्रमांकावर घसरण झालेल्या युकीने पात्रता फेरीतून आगेकूच केली आहे. आता युकीसमोर अर्जेंटिनाच्या गुईडो पेल्ला याचे आव्हान असेल. गुईडो ९७व्या स्थानावर आहे. माँफिस हा पूर्वी ‘टॉप टेन’मध्ये होता. २०१४च्या अखेरीस त्याने सहाव्या क्रमांकापर्यंत मजल मारली होती. युकीने पहिल्या सेटच्या आठव्या गेममध्ये ब्रेक नोंदवीत ५-३ अशी आघाडी घेतली. या ब्रेकच्या जोरावर त्याने पहिला सेट जिंकला. दुसऱ्या सेटमध्येही युकीने आत्मविश्‍वासाने प्रारंभ केला. त्याने पहिल्याच गेममध्ये माँफिसची सर्व्हिस भेदली. त्यानंतर मात्र युकीची एकाग्रता ढळली. त्याने सलग चार गेम गमावले. दुसऱ्या व चौथ्या गेममध्ये सर्व्हिस गमावल्यानंतर तो १-४ असा मागे पडला. माँफिसला ५-३ अशा स्थितीस सर्व्हिस राखण्याची गरज होती, पण युकीने ब्रेक मिळविला. त्यामुळे तो ४-५ अशी पिछाडी कमी करू शकला. त्यानंतर त्याला सर्व्हिस राखणे अनिवार्य होते, पण त्याच्यावर दडपण आले. त्यातून त्याच्याकडून दोन ‘डबल फॉल्ट’ झाल्या. ३०-३० अशा स्थितीस झालेल्या या चुकांमुळे त्याने हा सेट गमावला. निर्णायक सेटमध्ये युकीला प्रारंभी काही ब्रेकपॉइंटचा फायदा उठविता आला नाही. दोन्ही खेळाडूंनी दहाव्या गेमपर्यंत सर्व्हिस राखली. तेव्हा चुरस शिगेला पोचली होती. युकीने ११व्या गेममध्ये ब्रेक नोंदविला. त्यानंतर त्याने सर्व्हिस आरामात राखली.

माईलस्टोन विजय
माँफिस झंझावाती सर्व्हिस करतो. कोर्टवर तो विजेच्या चपळाईचे फुटवर्क प्रदर्शित करतो. कारकिर्दीच्या प्रारंभी नव्या पिढीतील प्रतिभासंपन्न टेनिसपटूंमध्ये त्याची गणना झाली होती. मुख्य म्हणजे तो कोर्टवर भावभावना सतत व्यक्त करीत असतो. त्याच्याविरुद्ध खेळताना हाच मुद्दा अनेक मातब्बर खेळाडूंसाठी सुद्धा डोकेदुखी ठरतो. अशा वेळी युकीने नेटजवळ धाव घेण्याचे डावपेच लढविले. तिसऱ्या सेटमध्ये त्याने ‘नेट ॲप्रोचेस’मध्ये सर्व १६ गुण जिंकले. त्यामुळेच तो माँफिसचा धडाका विस्कळित करू शकला. युकीची सर्व्हिस भक्कम झाली.