राज्यातील कुस्तीगीर चीतपट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 एप्रिल 2017

भारतीय संघात राज्यातील एकही कुस्तीगीर नाही; योगेश्‍वर, साक्षी चाचणीपासून दूर
मुंबई - सुशील कुमार, योगेश्‍वर दत्त, साक्षी मलिक यांच्याविनाच अपेक्षेनुसार आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली, पण निवडलेल्या या संघात राज्याच्या एकाही कुस्तीगीराचा समावेश नाही.

भारतीय संघात राज्यातील एकही कुस्तीगीर नाही; योगेश्‍वर, साक्षी चाचणीपासून दूर
मुंबई - सुशील कुमार, योगेश्‍वर दत्त, साक्षी मलिक यांच्याविनाच अपेक्षेनुसार आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली, पण निवडलेल्या या संघात राज्याच्या एकाही कुस्तीगीराचा समावेश नाही.

आशियाई कुस्ती स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी सोनीपतला भारतातील संभाव्य कुस्तीगीरांचे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराबरोबरच प्रसंगी शिबिरात नसलेल्या कुस्तीगीरांनाही चाचणीत प्रवेश देण्यात येईल, असे भारतीय कुस्ती महासंघाने स्पष्ट केले होते. मे महिन्यात दिल्लीत होणाऱ्या या आशियाई स्पर्धेत 21 देशांचा सहभाग अपेक्षित आहे.

लखनौला झालेल्या चाचणीत रेश्‍मा माने (63 किलो), सोनाली तोडकर (58 किलो), राहुल आवारे (61 किलो) आणि उत्कर्ष काळे (57 किलो) यांचा सहभाग होता. मात्र राज्याचा एकही कुस्तीगीर संघात येऊ शकला नाही.

उत्कर्ष तसेच राहुलकडून अपेक्षा होत्या, पण उत्कर्षला संदीप तोमरविरुद्ध हार पत्करावी लागली, तर राहुल छत्रसालच्या स्पर्धकाविरुद्ध पराजित झाला. रेश्‍माने चांगली लढत दिली होती, असे कुस्ती महासंघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

या चाचणीत चांगली चुरस झाली. कडव्या लढतीनंतर स्पर्धकांची निवड झाली आहे. गतस्पर्धेत भारतीय पुरुषांनी एकूण सहा पदके जिंकली होती, त्यापेक्षा नक्कीच सरस कामगिरी होईल. महिला गटातही तीन ते चार पदकांची नक्कीच आशा आहे, असे भारताचे कुस्ती मार्गदर्शक कुलदीप मलिक यांनी सांगितले. त्याचबरोबर त्यांनी इराण, कझाकिस्तानबरोबरच जपान उझबेकिस्तानही ताकदवान प्रतिस्पर्धी असतील, असेही सांगितले.

भारतीय कुस्ती संघ, महिला- 48 किलो - रितू, 53 किलो - सीमा, 55 किलो - विनेश फोगट, 58 किलो - मंजू कुमारी. 60 किलो - सरिता, 63 किलो - रितू मलिक. 69 किलो - दिव्या. 75 किलो - ज्योती.

पुरुष फ्रीस्टाईल - 57 किलो - संदीप तोमर. 61 किलो - हरफुल, 65 किलो - बजरंग. 70 किलो - विनोद, 74 किलो - जितेंदर. 84 किलो - सोमवीर. 97 किलो - मौसम खत्री. 125 किलो - सुमीत.

ग्रीको रोमन- 59 किलो - ग्यानेंदर. 66 किलो - रविंदर. 71 किलो - दीपक. 75 किलो - हरिंदर. 80 किलो - हरप्रीत. 85 किलो - अमित कुमार. 98 किलो - हरदीप. 130 किलो - नवीन.

महाराष्ट्रातील कुस्तीगीरांसमोर खुराकाचा प्रश्‍न आहे. त्यामुळे त्यांना कुस्ती मैदानात खेळून पैसे मिळवावे लागतात. ही मैदाने लागोपाठ होतात, त्यामुळे पुरेशी विश्रांती मिळत नाही, तसेच सरावातही खंड पडतो. याचा परिणाम राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेतील कामगिरीवर होतो.
- राज्यातील वरिष्ठ कुस्ती पदाधिकारी.

Web Title: state wrestlers knockout