खेळपट्टीची चर्चा पुरे - कुंबळे

खेळपट्टीची चर्चा पुरे - कुंबळे

बंगळूर - ‘‘खेळपट्टीमुळे कोणताही संघ जिंकत किंवा हरत नाही किंवा कोणताही खेळाडू यशस्वी किंवा अयशस्वी ठरत नाही. त्या खेळपट्टी आणि वातावरणाशी जुळवून घेणे महत्त्वाचे असते. पुण्यातील कसोटी सामन्यात भारतीय संघाने वातावरण आणि खेळपट्टीशी जुळवून घेतले नाही. क्रिकेटच्या तीनही आघाड्यांवर अपेक्षित खेळ झाला नाही म्हणून अपयश पदरी पडले. तेव्हा, इथून पुढे खेळपट्टीची चर्चा बस करा आणि क्रिकेटविषयी बोला, अशा शब्दांत भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी खेळपट्टीवरून सुरू असलेल्या चर्चेला संघ व्यवस्थापनाच्या दृष्टीने पूर्णविराम दिला. 

भारतीय संघाने पहिल्या कसोटी सामन्यातील पराभव मागे टाकून दुसऱ्या कसोटीची तयारी सुरू केल्याचेच संकेत कुंबळे यांच्या वक्तव्यावरून दिसून आले. सामन्याला दोन दिवस बाकी असताना भारतीय संघातील काही खेळाडू चिन्नास्वामी मैदानावर सरावाला उतरलेले दिसून आले.  

कुंबळे म्हणाले,‘‘आपला संघ इतके दिवस उत्तम खेळ करून जिंकत असताना कोणी जास्त प्रश्‍न विचारले नाहीत. एका पराभवानंतर किती शंका काढता? खेळात असे होते. नेहमी जिंकणे शक्‍य नसते. समोरचा संघ सर्व ताकदीनिशी मैदानात जिंकायला आणि आपल्या देशाचे नाव उज्ज्वल करायलाच उतरत असतो, हे विसरता कामा नये. गेल्या सामन्यात झालेल्या चुका परत होता कामा नयेत याकडे आमचे लक्ष असेल.’

उत्साहाचे वातावरण
दुसऱ्या कसोटी सामन्याकरता संघाच्या तयारीबद्दल बोलताना कुंबळे म्हणाला. ‘‘प्रशिक्षकाचे काम संघाची पुढील लढतीकरता सर्वोत्तम तयारी करून घेणे हे असते. ही तयारी मैदानावरची असते तशीच मैदानाबाहेरची असते. मैदानावर सराव करून कौशल्य वाढवणे गरजेचे असते तितकेच संघ बांधणीकरता एकत्र राहणे सतत आनंदी वातावरण संघात ठेवणे हे गरजेचे असते. मेहनती इतकेच मोल विश्रांतीला असते. भारतीय संघ सातत्याने क्रिकेट खेळत असल्याने खेळाडूंना प्रवासाचा आणि सामन्याचा मिळून थकवा येत राहतो. त्यावर उपाय योजना कराव्या लागतात. कधीकधी खेळापासून काही काळ लांब जाऊन काहीतरी वेगळीच ॲक्‍टिव्हिटी करण हाच जालीम उपाय ठरतो. ती आम्ही केली आहे. संघ एकदम ताजातवाना आहे. उत्साहाचे वातावरण आहे.’’

बदलाची शक्‍यता कमीच
पहिल्या कसोटीत दोनही डावात भारतीय फलंदाजी कोलमडली त्याचा विचार करता संघात बदल होण्याची शक्‍यता विचारता कुंबळे म्हणाला, ‘‘करुण नायरसारखा त्रिशतकवीर संघात बसत नाही, याचे दु:ख आम्हालाही होते. फक्त हे लक्षात ठेवायला हवे की, करुणला संधी मुख्य खेळाडू तंदुरुस्त नसल्याने मिळाली होती ज्याचे त्याने सोनं केले होते. काही सामन्यात अपयश आल्यावर माध्यमे अजिंक्‍य रहाणेच्या संघातील जागेबद्दल विचारतात तेव्हा आश्‍चर्य वाटते. गेली तीन वर्ष अजिंक्‍यने प्रत्येक दौऱ्यात अप्रतिम फलंदाजी केली आहे. त्याला संघातून वगळण्याचा संघ व्यवस्थापनाचा अजिबात विचार नाही.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com