अझलन शाह स्पर्धेत बचाव ठरणार निर्णायक - रुपिंदर

पीटीआय
बुधवार, 19 एप्रिल 2017

सराव शिबिरात झालेल्या अभ्यासात पेनल्टी कॉर्नरवरदेखील लक्ष केंद्रित करण्यात आले होते. पेनल्टी कॉर्नर यशस्वी करण्यासाठी भारतीय खेळाडू आता तयार झाले आहेत. जुगराजचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल. या स्पर्धेत कॉर्नरवरील गोलची संख्या वाढलेली असेल.
-रोएलॅंट ऑल्टमन्स, भारतीय संघाचा प्रशिक्षक

बंगळूर - सुलतान अझलन शाह स्पर्धेला सुरवात होण्यासाठी दहा दिवसांचा कालावधी बाकी असताना भारतीय संघातील प्रमुख ड्रॅग फ्लिकर रुपिंदर पाल सिंग याने संघातील नवोदित खेळाडू आव्हान पेलण्यास सज्ज झाले असून, भक्कम बचाव अझलन शाह स्पर्धेत निर्णायक ठरू शकतो, असे मत मंगळवारी येथे व्यक्त केले.

स्पर्धेत मलेशिया, ऑस्ट्रेलिया, ग्रेट ब्रिटन, न्यूझीलंड आणि जपान या अन्य देशांचा सहभाग आहे. रूपिंदर म्हणाला, ‘‘स्पर्धेपूर्वी झालेल्या ४० दिवसांच्या सराव शिबिरात प्रत्येक खेळाडूने मेहनत घेतली आहे. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या देखील भारतीय खेळाडू तंदुरुस्त आहेत. संघाला नव्याने ॲनालिटिकल प्रशिक्षक मिळाल्याने नियोजनात थोड बदल करण्यात आला आहे. बचावावर अधिक भर देण्यात आला असून, हे नियोजन शंभर टक्के मैदानात उतरले तर आम्हाला सामने जिंकण्यास त्याचा फायदाच होईल.’’

स्पर्धेस मलेशियात इपोह येथे २९ एप्रिलपासून सुरवात होणार असून, भारतीय संघ मलेशियासाठी २२ एप्रिलला रवाना होणार आहे. हरमनप्रीत, गुरिंदर, प्रदीर मोर आणि सुरेंदर कुमार या नवोदित खेळाडूसह अनुभवी रुपिंदरवर भारतीय बचावाची खरी मदार आहे. रूपिंदरने देखील हे मान्य केले. तो म्हणाला, ‘‘नक्कीच माझ्यावरील जबाबदारी वाढली आहे. मला संघातील युवा खेळाडूंना देखील दिशा द्यायची आहे. पण, त्यांची तयारी पूर्ण असल्याची मला खात्री आहे. आपल्याला कशी कामगिरी करायची आहे आणि जबाबदारी काय आहे याची जाणीव प्रत्येकाला आहे. त्यामुळे प्रत्येकाकडून शंभर टक्के योगदान अपेक्षित आहे.’’

सराव शिबिरात झालेल्या नियोजना-विषयी बोलताना रुपिंदर म्हणाला, ‘‘दररोजच्या सरावात आम्ही दुपारच्या सत्रात रोज एक तास ड्रॅग फ्लिक-साठी राखून ठेवला होता. भारताचा माजी ड्रॅग फ्लिक तज्ज्ञ जुगराज सिंग याचे देखील मार्गदर्शन आम्हाला मोलाचे ठरले आहे. संघाला प्रथमच ड्रॅग फ्लिकसाठी स्वतंत्र प्रशिक्षक मिळाल्याने या वेळी त्याचा फायदा होईल.’’

Web Title: Sultan Azlan Shah Cup