भारताच्या विजयाची श्रृंखला तुटली; चॅम्पियन्स ट्रॉफीवर पाकिस्तानने कोरले नाव

भारताच्या विजयाची श्रृंखला तुटली; चॅम्पियन्स ट्रॉफीवर पाकिस्तानने कोरले नाव
भारताच्या विजयाची श्रृंखला तुटली; चॅम्पियन्स ट्रॉफीवर पाकिस्तानने कोरले नाव

गोलंदाजीतील बेशिस्तीचा फटका भारतीय संघाला नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना बसला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 4 बाद 338 धावांचे आव्हान उभारले. मोठ्या धावसंख्येच्या दडपणाखाली भारतीय फलंदाजांनी साफ नांगी टाकली. महंमद अमीरने पहिल्या तीन फलंदाजांना लवकर बाद केल्यावर भारताच्या आव्हानातील हवा निघून गेली. मोठ्या अपेक्षांचा अंतिम सामना म्हणजे अगदीच डोंगर पोखरून उंदीर निघाला. पाकिस्तानने भारताचा 180 धावांनी पराभव करून चॅम्पियन्स करंडकावर नाव कोरले.

सामन्याअगोदर एक तास प्रेक्षकांनी ओव्हल मैदान भरून टाकले. विराट कोहलीने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करायचा निर्णय घेतला. नव्या चेंडूवर भुवनेश्‍वर कुमार आणि बुमराने मस्त मारा केला. सलामीच्या फलंदाजांना हात मोकळे करायची संधी दोघांनी दिली नाही. फक्त 3 धावांवर फखर झमानला बुमराने झेलबाद केले. फलंदाज तंबूत परतत असताना पंचांनी त्याला परत बोलावले कारण तो चेंडू नोबॉल होता. अझर अलीने जास्त विश्‍वासाने फलंदाजी केली. दोघांनी मिळून भारतीय गोलंदाजांना ओव्हल मैदानाच्या चारही कोपऱ्यात पिटाळायला सुरुवात केली. बघता बघता धावा वेगाने जमा व्हायला लागल्या. दोन्ही सलामीच्या फलंदाजांचे अर्धशतक पाठोपाठ फलकावर लागले. 59 धावा करून सुंदर फलंदाजी करणारा अझर अली धावबाद झाला. फखर झमानने अर्धशतकानंतर हवेतून चांगले फटके मारून शतकी मजल गाठली. 12 चौकार आणि 2 षटकार मारणाऱ्या फखरने 41 चेंडू धाव न घेता खेळून काढले तरीही त्याचे शतक 92 चेंडूत झाले ही कमाल होती. 114 धावा झाल्यावर पंड्याला फखर बाद झाला आणि भारतीय संघाने सुटकेचा श्‍वास सोडला.

अनुभवी महंमद हफीजने शेवटच्या काही षटकात सहजी मोठे फटके मारून फक्त 34 चेंडूत अर्धशतक केले. बाकी सर्व गोलंदाजांना भरपूर चोपले जात असताना एकट्या भुवनेश्‍वर कुमारने आपल्या 10 षटकांच्या माऱ्यात 2 निर्धावसह 44 धावा दिल्या. 50 षटकांच्या खेळात भारतीय गोलंदाजांनी तब्बल 13 वाईड आणि 3नो बॉल चेंडू टाकले. बेशिस्त गोलंदाजी, मोठे मैदान आणि चांगल्या खेळपट्टीचा फायदा घेत पाकिस्तान संघाने 4 बाद 338धावांचे दमदार आव्हान उभे केले. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना सुरुवात चांगली होणे अपेक्षित होते. झाले भलतेच. महंमद अमीरने रोहित शर्मा, विराट कोहली आणि शिखर धवनला पहिल्या स्पेलमधे बाद करून पाठलागाच्या प्रयत्नांचे चाक पंक्‍चर केले. त्या धक्‍क्‍यातून भारतीय संघ सावरला नाही. युवराज, धोनी आणि केदार जाधव जास्त छाप न पाडता तंबूत परतले.

मोठी पडझड होत असताना हार्दिक पंड्याने ताकदवान फटकेबाजी करून जरा लाज राखली. पंड्याने 4 चौकार आणि 6 षटकारांसह 43 चेंडूत 76 धावा केल्या तीच एक भारतीय फलंदाजीची जमेची बाजू ठरली. जरा रंगलेल्या 80 धावांच्या भागीदारीनंतर हार्दिक पंड्या अत्यंत भयानक प्रकारे धावबाद झाला तेव्हा भारतीय प्रेक्षकांनी रेल्वे स्टेशनचा रस्ता पकडला. एकतिसाव्या षटकात भारताचा डाव 158 धावांवर आटोपला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com