मुलांना घराजवळ मिळणार जागतिक दर्जाचे बुद्धिबळ प्रशिक्षण: आनंद

शनिवार, 11 नोव्हेंबर 2017

मुलांना त्यांच्या घराजवळ शिकविण्याची संधी मला मिळणार आहे. उच्च स्तरावर खेळण्याची संधी त्यांना मिळणार असल्याने मुलांमधील गुणवत्तेला वाव मिळेल. येथील सुविधांमुळे मी खूप खूश आहे. येथून अनेक प्रतिभावंत खेळाडू समोर येतील, अशी मला आशा आहे. मी यापुढेही खेळतच राहणार आहे.

पुणे : मुलांना त्यांच्या घराजवळ नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून जागतिक दर्जाचे प्रशिक्षण देण्याची संधी मिळणार आहे. मुलांना हसत-खेळत बुद्धिबळ खेळता येणार असल्याने नक्कीच त्यांच्यातील गुणवत्ता समोर येईल, असा विश्वास पाचवेळचा जागतिक बुद्धिबळ विजेता विश्वनाथन आनंद याने व्यक्त केला.

पुण्यातील खराडी भागातील गेरा डेव्हलपमेंट येथे विश्वनाथन आनंद आपली भारतातील पहिली अकादमी सुरु करत आहे. यानिमित्त तो पुण्यात आला होता. लहान मुलांना लक्ष्य ठेवून हा सर्व प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पामध्ये बुद्धिबळसह क्रिकेट, टेनिस, नृत्य, संगीत आणि मानसिक विकास याही अकादमी पहायला मिळतील. गेरा डेव्हलपर्सचे रोहित गेरा यावेळी उपस्थित होते.

विश्वनाथन आनंद म्हणाला, ''मुलांना त्यांच्या घराजवळ शिकविण्याची संधी मला मिळणार आहे. उच्च स्तरावर खेळण्याची संधी त्यांना मिळणार असल्याने मुलांमधील गुणवत्तेला वाव मिळेल. येथील सुविधांमुळे मी खूप खूश आहे. येथून अनेक प्रतिभावंत खेळाडू समोर येतील, अशी मला आशा आहे. मी यापुढेही खेळतच राहणार आहे. माझा याठिकाणी सर्व नवनवीन तंत्रज्ञान आणि खेळाडूंना बुद्धिबळ आणखी सोपे करून देण्याची भूमिका असणार आहे. आपल्या दारात माझी अकादमी असल्याने बुद्धिबळाबद्दल माझा आनंद आणि उत्कटता तुमच्यासाठी देण्याची संधी मला मिळणार आहे. तरुणांना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळाल्याने भविष्यात बुद्धिबळ चॅम्पियन्स लीगची निर्मिती होईल. माझे सतत या अकादमीवर लक्ष राहणार आहे. याठिकाणी सर्वोत्तम खेळाडू घडविण्याचा माझा प्रयत्न असेल.