भारतीय फुटबॉलच्या हिताचाच निर्णय घेऊ 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 5 मे 2017

आय-लीग स्पर्धेत आश्‍चर्यकारक विजेतेपद मिळविल्यानंतर ऐजॉल संघाच्या समावेशावरून सध्या वाद निर्माण झाला आहे. दोन स्पर्धांचे विलीनीकरण झाल्यानंतर आय-लीगमधील केवळ तीन संघांचा समावेश करण्यात येणार आहे.

कोलकता - आय-लीग आणि आयएसएल या दोन स्पर्धांचे विलीनीकरण करताना भारतीय फुटबॉलच्या हिताचाच विचार करून निर्णय घेऊ, असे प्रतिपादन भारतीय फुटबॉल महासंघाचे सचिव कुशल दास यांनी गुरुवारी केले. 

आय-लीग स्पर्धेत आश्‍चर्यकारक विजेतेपद मिळविल्यानंतर ऐजॉल संघाच्या समावेशावरून सध्या वाद निर्माण झाला आहे. दोन स्पर्धांचे विलीनीकरण झाल्यानंतर आय-लीगमधील केवळ तीन संघांचा समावेश करण्यात येणार आहे. यात विजेते असूनही ऐजॉल संघाचा समावेश नाही. त्यामुळे ऐजॉल संघाने बंडाचा पवित्रा घेतल्यामुळे भारतीय फुटबॉल महासंघ सध्या दडपणाखाली आहे. 

विलीनीकरणानंतर फ्रॅंचाईजींच्या आठ संघांसह समावेश होणाऱ्या तीन आय-लीगमधील संघात बंगळूर एफसी, मोहन बागान आणि ईस्ट बंगाल या तीन क्‍लबचा समावेश आहे. कुशल दास म्हणाले, ""ऐजॉल क्‍लबने आम्हाला अधिकृत विनंती पत्र दिले आहे. त्याचा विचार होईलच, पण आम्ही देशातील क्‍लब फुटबॉलचे स्वरूपच बदलणार आहोत. त्याबाबत चर्चा सुरू आहे. अजून अंतिम निर्णय झालेला नाही. निर्णय घेताना भारतीय फुटबॉलच्या हिताचाच विचार आम्ही करू.'' 

गेल्या आठवड्यात महासंघाचे अध्यक्ष प्रफुल पटेल आणि मोहन बागान, ईस्ट बंगाल क्‍लबदरम्यान झालेल्या बैठकीनंतरच ऐजॉलच्या समावेशावरून प्रश्‍न उपस्थित झाला. दास म्हणाले, ""हे दोन्ही क्‍लब देशातील जुने आहेत. त्यामुळे त्यांच्या समावेशाचा आग्रह धरला जात आहे. आम्ही सर्व बाजूंनी विचार करू. ऐजॉलचा मुद्दा वेगळा आहे. खेळाचे हित जपले जाईल असाच आमचा निर्णय असेल. ऐजॉल यंदाचे विजेते आहेत, हे आम्ही या वेळी विसरणार नाही.''