गणेश विसर्जन मिरवणुकींचे थेट प्रक्षेपण "साम'वर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

मुंबई - विद्येचे आराध्यदैवत असलेल्या श्री गणरायाचे थाटामाटात स्वागत झाले. घराघरांत आणि सार्वजनिक ठिकाणीही श्री गजाननाची मनोभावे पूजाअर्चा झाली. उत्सवातील भक्ती, पावित्र्य, परंपरा, कलासंस्कृती अशा विविध गुणवैशिष्ट्यांच्या छटा घेऊन गणराया अनंतचतुर्दशी दिवशी (मंगळवार, ता. 5) मार्गस्थ होत आहेत. या सोहळ्याच्या आनंददायी छटा "साम वाहिनी'वरून थेट प्रक्षेपित केल्या जाणार आहेत. यामुळे घरोघरच्या असंख्य गणपती भक्तांसह रसिकांना हा अनुपम सोहळा अनुभण्याची संधी उपलब्ध होत आहे. गेली नऊ वर्षे "साम वाहिनी'वरून विसर्जन मिरवणुकांचे थेट प्रक्षेपण यशस्वीरीत्या सादर केले जात आहे. मंगळवारी सकाळी 8 वाजल्यापासून थेट प्रक्षेपणाला सुरवात होईल. मुंबई, पुणे तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरातील विसर्जन मिरवणुकींचे थेट प्रक्षेपण आणि त्यातील वेगळेपण प्रेक्षकांसमोर "पुढच्या वर्षी लवकर या' कार्यक्रमातून बघावयास मिळणार आहे. "एसपीएनएस फर्निचर' मुख्य प्रायोजक असलेल्या या कार्यक्रमासाठी चितळे उद्योगसमूह, आनंदी वास्तू, राजषी शाहू बॅंक, सुजानिल केमो इंडस्ट्रीज, कृपा हेअर टॉनिक आणि राजगुरुनगर सहकारी बॅंक हे सहप्रायोजक आहेत.