परदेशी विद्यापीठांत यिन सदस्यांनाही संधी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 नोव्हेंबर 2016

तरुणांमध्ये नेतृत्वगुण विकसित व्हावेत; तसेच उद्योजक बनण्याचे कौशल्य त्यांच्यात निर्माण व्हावे, यासाठी ख्यातनाम परदेशी विद्यापीठांशी करार करण्यात येत आहेत. यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कच्या (यिन) गुणी सदस्यांनाही ही संधी मिळणार आहे. ती त्यांनी सोडू नये, असे अभिजित पवार यांनी येथे सांगितले. 

तरुणांमध्ये नेतृत्वगुण विकसित व्हावेत; तसेच उद्योजक बनण्याचे कौशल्य त्यांच्यात निर्माण व्हावे, यासाठी ख्यातनाम परदेशी विद्यापीठांशी करार करण्यात येत आहेत. यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कच्या (यिन) गुणी सदस्यांनाही ही संधी मिळणार आहे. ती त्यांनी सोडू नये, असे अभिजित पवार यांनी येथे सांगितले. 

इस्राईलमधील आयडीसी हरझेलिया विद्यापीठ तसेच अमेरिका व दक्षिण आफ्रिकेतील एकेका विद्यापीठाशी याबाबत बोलणी सुरू आहेत. त्यांच्याशी लवकरच याबाबत करार केला जाईल. ख्यातनाम उद्योगपतींबरोबर चर्चा करण्याची संधीही तरुणांना मिळेल. पुढील वर्षाच्या पहिल्या महिन्यापासून हे कार्यक्रम सुरू होतील. मात्र त्यासाठी तुमच्यातही काही विशेष गुण असायला हवेत. तुमच्या बोलण्याची त्या मोठ्या उद्योगपतींवर छाप पडली पाहिजे. तुम्ही या उद्योगपतींच्या कायमचे स्मरणात राहिले पाहिजे, असा कानमंत्रही पवार यांनी दिला. 

मी महाविद्यालयात असल्यापासून व्यवसाय सुरू केला आणि पदवीधर होईपर्यंत स्वतःची गाडीही घेतली. मला त्यात अनेक धक्केही खावे लागले. तुम्हाला धक्के न खाता व्यवसाय सुरू करण्याची संधी या कार्यक्रमांतून मिळेल. त्याचा तुम्ही जरूर लाभ घ्या. आपण राज्यात यासाठी स्पर्धा घेऊन ५० विद्यार्थ्यांची निवड करू. त्यात ‘यिन’च्या सदस्यांना प्राधान्य मिळेल. इस्राईलमधील आयडीसी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाचे शुल्क मोठे आहे; मात्र त्यासाठी निवडल्या गेलेल्या काही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन इस्राईलमधील शिक्षणाचा त्यांचा सर्व खर्च केला जाईल. तुमच्या भविष्यासाठी हे अभ्यासक्रम अत्यंत उपयुक्त ठरतील, असे ते म्हणाले. मलेशियात परिवर्तन घडवून आणणारे दातोश्री इद्रिस जाला, आफ्रिकेतील शेतीचा कायापालट करून ती निर्यातप्रवण करणारे एतान स्टीबी, फ्रॅंक रिश्‍टर, एस्टेबान गोमेझ, जर्मनीमधील प्रमुख विद्वान प्रा. पीटर वायबल आदी मान्यवर आपल्याकडे येणार आहेत. प्रा. वायबल कधी जर्मनीबाहेर जातच नाहीत; पण आपल्यासाठी ते येतील, असे पवार यांनी सांगताच तरुणांनी टाळ्यांचा कडकडाट करून उत्स्फूर्त दाद दिली. 

शिकण्यासाठी इस्राईलच उत्तम
आपणा सर्वांना युरोप, अमेरिकेत शिकण्यासाठी जावे असे वाटते; पण शिकण्यासाठी इस्राईलसारखा दुसरा उत्तम देश नाही. संधी मिळाली तर तिथेच जा, असे पवार यांनी सुचवले. 

थिंक टॅंक नको, डू टॅंकची गरज
आपल्याकडे भरपूर ‘थिंक टॅंक’ आहेत; पण प्रत्यक्ष कृतीसाठी कुणीही नाही. सरकार, उद्योगसमूह, स्वयंसेवी संस्था व संशोधक या व्यक्ती समाजाचे प्रश्‍न सोडवू शकतात. असा कृतिगट निर्माण करण्यासाठी आपण समाजाच्या सर्व स्तरांतील मान्यवरांची मदत घेत आहोत. समाजाची प्रगती करण्यासाठी तसेच अडचणी सोडवण्यासाठी एक हजार मान्यवरांचा गट आपल्या मदतीला येत आहे, अशी माहिती पवार यांनी दिली.

Web Title: Yin members of foreign universities opportunity

टॅग्स