सीताफळावरील संशोधनाबद्दल बार्शीच्या कसपटेंना राष्ट्रीय पुरस्कार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 एप्रिल 2017

सोलापूर - केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयांतर्गत देण्यात येणारा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार गोरमाळे (ता. बार्शी) येथील नवनाथ कसपटे यांना जाहीर झाला आहे. नापिक वाण संरक्षण व शेतकरी हक्क प्राधिकरणाच्या वतीने वनस्पती जनुकीय संवर्धन समूह या संकल्पनेंतर्गत सीताफळाच्या पिकामध्ये अतुलनीय कामगिरी, तसेच सीताफळामध्ये वेगवेगळी वाणे विकसित केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती प्रमोद पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

येत्या 19 एप्रिलला चंपारण (बिहार) येथे एका विशेष कार्यक्रमात केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह यांच्या हस्ते आणि शेतकरी हक्क प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. आर. आर. हंचनाळ यांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण होणार आहे. रोख दीड लाख रुपये, प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयांतर्गत कार्यरत पीक वाण संरक्षण व शेतकरी हक्क प्राधिकरणातर्फे 2007 पासून कृषी वाणांचे संरक्षण व संशोधन करणाऱ्या देशातील निवडक शेतकरी व संस्थांना हा पुरस्कार दिला जातो. 

कसपटे गेल्या 40 वर्षांपासून सीताफळाच्या पिकावर संशोधन व प्रयोग करत आहेत. त्यांच्याकडे सीताफळाच्या 40 हून अधिक वाणांचे संकलन आहे, तर 22 वाणांचे पृथक्‍करण केले आहे. त्यातून निवड पद्धतीने एनएमके-1 (गोल्डन) हा वाण देशांतर्गत स्थानिक बाजारपेठेसह परदेशांतही निर्यातीसाठी फायदेशीर ठरला आहे. या वाणासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नामुळेच त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. ऑस्ट्रेलियात 2012 मध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय सीताफळ परिषदेतही ते सहभागी झाले होते. पंजाब कृषी विद्यापीठ आणि गुजरात सरकारच्या कृषी विभागानेही यापूर्वी त्यांचा सन्मान केला आहे.