सागर चौगुले यांचा पुण्यात नाट्यप्रयोगादरम्यान मृत्यू 

सागर चौगुले यांचा पुण्यात नाट्यप्रयोगादरम्यान मृत्यू 

पुणे - राज्य सरकारच्या वतीने आयोजित हौशी राज्य नाट्य स्पर्धेदरम्यान "अग्निदिव्य' या नाटकात प्रमुख भूमिकेतील युवा रंगकर्मी सागर 
चौगुले (वय 35) यांचा पुण्यात प्रयोग सुरू असताना रंगमंचावरच शुक्रवारी हृदयविकाराने मृत्यू झाला. टिळक स्मारक मंदिरात रात्री पावणेनऊच्या सुमारास घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे नाट्यगृहात खळबळ उडाली. या नाटकात चौगुले यांनी छत्रपती शाहू महाराजांची भूमिका साकारली होती. 

दरम्यान, उपचाराकरिता चौगुले यांना पूना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले. 

या साऱ्या अनपेक्षित प्रकाराने कलाकारांनी हॉस्पिटल परिसरातच हंबरडा फोडला. 

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित केलेल्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत चौगुले यांच्या नाट्यपथकातर्फे "अग्निदिव्य' या नाटकाचे सादरीकरण सुरू होते. रात्री आठ वाजता हा प्रयोग सुरू झाला. प्रयोगात चौगुले यांचा तिसरा प्रवेश झाल्यानंतर काही वेळातच ते अचानक रंगमंचावरच कोसळले. सहकलाकारांनी चौगुले यांच्याकडे धाव घेत, त्यांना हलविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, प्रेक्षकांतील एका डॉक्‍टरांनी चौगुले यांच्यावर प्रथमोपचार केले. मात्र, चौगुले यांना अधिकच अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना जवळच्या पूना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलविण्यात आले. तेथे त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले. 

चौगुले हे मूळचे कोल्हापूरचे असून, गेल्या अनेक वर्षांपासून तेथील हृदयस्पर्श सांस्कृतिक व्यासपीठाच्या माध्यमातून त्यांनी विविध नाटकांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. या व्यासपीठानेच "अग्निदिव्य' नाटकाची निर्मिती केली आहे.

राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे 56 व्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेच्या कोल्हापूर केंद्रातून हृदयस्पर्श हौशी नाट्य संस्थेच्या "अग्निदिव्य' या नाटकाची अंतिम फेरीसाठी निवड झाली होती. काळम्मावाडीच्या हनुमान नाट्य संस्थेच्या सहकार्याने हे नाटक सादर झाले. प्राथमिक फेरीत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या भूमिकेसाठी चौगुले यांना अभिनयाचे रौप्यपदकही मिळाले. अंतिम फेरीत बाजी मारायचीच, या निर्धाराने ही टीम गेली महिनाभर कसून सराव करीत होती. 

पुण्याला जाण्यापूर्वी गेल्याच आठवड्यात या नाटकाचा सदिच्छा प्रयोगही केशवराव भोसले नाट्यगृहात झाला होता. कोल्हापुरातील बहुतांशी सर्वच कला संस्था आणि सेवाभावी व्यक्तींनी या नाटकाला शुभेच्छांचे पाठबळही दिले. आज सकाळी पन्नासहून अधिक कलाकार-तंत्रज्ञांची टीम पुण्याला रवाना झाली होती.

रात्री आठ वाजता प्रयोग सुरू झाला. प्रयोग सुरू झाल्याची अपडेटस्‌ सोशल मीडियावरही आली होती.

श्री. चौगुले हे प्रसिध्द पार्श्‍वगायक सुरेश वाडकर यांचे भाचे होत. त्यांचे वडिल मराठी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शक म्हणून परिचित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com