शेतकऱ्यांसाठी व्हावेत असे उत्सव...

संग्राम शिवाजी जगताप
शनिवार, 5 नोव्हेंबर 2016

नाशिक येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय फलोत्पादन परिषदेच्या निमित्ताने राज्यभरातील फलोत्पादन क्षेत्राशी संबंधित शेतकरी, तज्ज्ञ आणि व्यावसायिक तसेच राजकीय नेते एकाच छताखाली एकत्र आले आहेत. यानिमित्ताने समोर आलेली काही निरीक्षणे...

नाशिक येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय फलोत्पादन परिषदेच्या निमित्ताने राज्यभरातील फलोत्पादन क्षेत्राशी संबंधित शेतकरी, तज्ज्ञ आणि व्यावसायिक तसेच राजकीय नेते एकाच छताखाली एकत्र आले आहेत. यानिमित्ताने समोर आलेली काही निरीक्षणे...

फलोत्पादनापुढील आव्हान
फलोत्पादनातील सर्वांत महत्त्वाचे उत्पादन आणि बाजारभाव हे आहे. वेळोवेळी येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती आणि अवकाळी, अनिश्‍चितता पाऊस यामुळे उत्पादनही बेभरवशाचे झाले आहे.
त्याचप्रमाणे मालाला मिळणारे भाव स्थिर नसतात. त्यामुळे शेतकऱ्याला नुकसान सहन करावे लागते. या गोष्टी लक्षात घेऊन फलोत्पादन परिषदेत हवामान बदल (Climate Change) आणि प्रक्रिया उद्योग या विषयांवर भर देण्यात आला आहे. तो शेतकऱ्यांच्या दृष्टीने फायदेशीर ठरणारा आहे.

जास्तीत जास्त प्रक्रिया उद्योग उभारल्यास कृषिमालाची बाजारात होणारी गर्दी थांबेल. त्यामुळे बाजारातील शेतमालाचे भाव स्थिर राहण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे प्रक्रियेमुळे नाशवंत मालाचे टिकाऊ मालामध्ये रुपांतर करण्यास मदत होईल. यामुळे शेत मालाचे मूल्य वाढणेही शक्‍य होईल. उत्पादनातील व विपणनातील अनिश्‍चितता व धोके कमी करण्यास निश्‍चित उपयोग होईल, असे फळ उत्पादनात नव्याने येणारे तंत्रज्ञान एका छताखाली पाहण्याची संधी प्रदर्शनांमधून मिळते. हे तंत्रज्ञान केवळ पाहण्याची नव्हे तर ते अभ्यासण्याची, त्याबद्दल सखोल माहिती घेऊन त्याबद्दल जाणून घेण्याची ही एक पर्वणीच शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होत असते. त्यामुळे केवळ साधारण कृषि प्रदर्शन म्हणून विविध विषयांची मोघम माहिती देण्याऐवजी शेतीतील एकाच विषयाला समर्पित अशी कृषि प्रदर्शने व परिसंवाद होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे त्याच विशिष्ट विषयामध्ये रस असणारे त्यासंबंधीच्या पिकांची लागवड करणारे शेतकरी एकत्र येऊन त्यावर संवाद घडून येईल.

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातील कृषि विज्ञान केंद्राचे कृषिविस्तार तज्ज्ञ डॉ. नितीन ठोके 'ईसकाळ'शी बोलताना आवर्जून नमूद केले की, सकाळच्या पुढाकाराने कृषि तंत्रज्ञान महोत्सव प्रदर्शनामुळे व राष्ट्रीय परिषदेमुळे फलोत्पादनाशी संबंधित सर्व छोट्या मोठ्या गोष्टींचा उहापोह येथे होत आहे, हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर आहे. अशाच प्रकारे फलोत्पादनाप्रमाणे ऊस शेती, सूक्ष्म सिंचन, करार शेती, कृषि यांत्रिकीकरण, कृषिपूरक व्यवसाय या व अशा शेतीतील एकेका विशिष्ट विषयाला समर्पित परिसंवाद व प्रदर्शने भरविण्यासाठी सामाजिक संस्थानी पुढाकार घ्यायला हवा.
फलोत्पादनाशी संबंधित कृषि उद्योजकांशी थेट चर्चा करण्याची संधीही शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळते. त्यातून शेतीशी संबंधित काही उद्योग करण्याची प्रेरणा शेतकऱ्यांना मिळत आहे.