महाराष्ट्रातील गुंतवणुकीसाठी 'अबुधाबी'चा पुढाकार

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 3 मार्च 2017

मुंबई - महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा व इतर महत्त्वाच्या क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी "अबुधाबी इन्व्हेस्टमेंट ऑथोरिटी' इच्छुक असून, त्यासंदर्भात या संस्थेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुरुवारी भेट घेतली. पायाभूत क्षेत्रात गुंतवणूक प्रत्यक्ष यावी यासाठी राज्य सरकार व संस्थेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची संयुक्त कार्य समिती स्थापन करण्याचे या वेळी ठरविण्यात आले.

राज्यातील पायाभूत क्षेत्रात गुंतवणुकीच्या संधींची माहिती घेण्यासाठी अबुधाबी इन्व्हेस्टमेंट ऑथोरिटीच्या शिष्टमंडळाने आज फडणवीस यांची "वर्षा' निवासस्थानी भेट घेतली. या शिष्टमंडळात ऑथोरिटीच्या प्रायव्हेट इक्विटी विभागाचे कार्यकारी संचालक हमद शाहवान अल धाहेरी, इंटरनल इक्विटी विभागाचे कार्यकारी संचालक मोहम्मद अल क्वामझी, मालमत्ता आणि पायाभूत सुविधा विभागाचे कार्यकारी संचालक खादीम अल रुमैथी, इक्विटी स्ट्रॅटेजी अँड प्लॅनिंग विभागाचे प्रमुख अल माजिद आणि आदित्य भार्गव आदींचा समावेश होता. या वेळी मुख्य सचिव सुमीत मल्लिक, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, मुंबई महानगर प्रदेश विकास महामंडळाचे आयुक्त मदान, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी आदी उपस्थित होते. राज्यात सुरू असलेल्या नागपूर- मुंबई समृद्धी महामार्ग, मेट्रो, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, स्मार्ट सिटी प्रकल्पांची माहिती तसेच यासाठी राज्य शासन करत असलेले प्रयत्न, गुंतवणुकीच्या विविध संधी आदींची माहिती या वेळी अबुधाबीच्या शिष्टमंडळास देण्यात आली.

फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र हे देशातील आघाडीचे राज्य आहे. राज्यात गुंतवणूक यावी, यासाठी राज्य शासनाने उद्योगस्नेही धोरणाबरोबरच इज ऑफ डुइंग बिझनेससारखी अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांत देशात झालेल्या एकूण थेट परकी गुंतवणुकीतील पन्नास टक्के गुंतवणूक ही एकट्या महाराष्ट्रात झाली आहे. राज्यात मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत. येत्या चार - पाच वर्षांत राज्यात आणखी मोठी गुंतवणूक होणार आहे. त्यामुळे राज्यात गुंतवणुकीची हीच योग्य वेळ असून, "अबुधाबी'ने येथे गुंतवणूक करण्यास प्राधान्य द्यावे. यासाठी राज्य सरकार व अबुधाबी इन्व्हेस्टमेंट ऑथोरिटीच्या अधिकाऱ्यांचे एक संयुक्त कार्य समिती स्थापन करावी, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी सांगितले.