मराठा क्रांती मोर्चा : अस्तित्वशोधाचा शांततामय लढा! 

प्रकाश पवार 
रविवार, 6 नोव्हेंबर 2016

'मराठा क्रांती मोर्चा' म्हणजे कुणाविरुद्धची अढी नव्हे, तर वास्तवाचा फेरविचार आहे. ही 'महाराष्ट्राची नवी ओळख' आहे.

'मराठा क्रांती मोर्चा' म्हणजे कुणाविरुद्धची अढी नव्हे, तर वास्तवाचा फेरविचार आहे. ही 'महाराष्ट्राची नवी ओळख' आहे.

सन 1990 च्या दशकापासून मराठा समाजात आर्थिक चौकटीमध्ये विसंगती उदयाला आल्या. त्यांचं प्रतिबिंब गेल्या काही महिन्यांपासून निघत असलेल्या मराठा क्रांती मोर्चांमध्ये दिसत आहे. आरक्षण, दलित अत्याचार प्रतिबंधक कायदा (ऍट्रॉसिटी), हिंदुत्वविरोध, बाजारभाव असे विषय मोर्चादरम्यान विषयपत्रिकेवर आले. याबद्दल सपाटीकरण केलं जात आहे; परंतु ही विषयपत्रिका लोकप्रिय असूनही, विषयपत्रिकेखेरीज मोर्चामधल्या लोकशक्तीमुळं मराठा समाजात दूरगामी बदल होत आहेत. उदाहरणार्थ ः समाजात लोकशाहीकरण प्रक्रिया गतिशील झाली आहे, तसंच महिला पितृसत्ताक सत्तेचा उबंरठा ओलांडत आहेत. या दोन्ही गोष्टी म्हणजे मोर्चामधून मराठा समाजासाठी मिळालेली एक आधुनिक देणगी आहे. या दोन्ही गोष्टी म्हणजे मराठ्यांची आधुनिकतेच्या संदर्भातली फेरव्याख्या आणि फेररचना ठरली आहे.

परंपरागत भाषेत हा मराठ्यांचा नवा जन्म होण्यासारखं किंवा समाजानं कात टाकण्यासारखं आहे. हा आत्मविश्‍वास मराठा समाजातील मुली-स्रियांना मिळालेला आहे. एवढंच नव्हे, तर प्रदेशनिहाय वेगवेगळी भूमिका पुढं येत आहे; त्यामुळं गेल्या 65 वर्षांतली राजकीय सत्तेची व सार्वजनिक धोरणाची फेरसमीक्षा सुरू झाली आहे. ही समीक्षा दुसऱ्या कुणी करण्यापेक्षा खुद्द मराठा करू लागले आहेत. त्यामुळं आत्मसमीक्षा हा नवा गुण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग होऊ पाहत आहे. सामाजिक संबंधांची फेरव्याख्या होत आहे. या घडामोडी सहिष्णू व मतभिन्नतेचा आदर करून होत आहेत. समाजानं मतभेदांच्या पुढं जाण्यासाठी घडामोडी उपयुक्त ठरतात. जुन्या-नव्याच्या समन्वयापेक्षा डोळस चर्चा घडत आहेत. या गोष्टी म्हणजे सरंजामी व्यवस्था व मूल्यव्यवस्था यातून बाहेर पडण्याची घटनाच होत.

मथितार्थ, जबाबदारी आणि कायद्याच्या राज्यातल्या नवीन व्यवहारांची दृष्टी यामध्ये दिसते. मराठा समाजाकडून हा आधुनिक, नवीन प्रारंभ झाला आहे. मराठ्यांच्या संदर्भात नव्या युगाची ही सुरवात सर्वव्यापक व दूरगामी अशी दिसते. त्यांच्या वेदना फार तीव्र आहेत. त्याबद्दल मतभिन्नता आहेत. त्या मतभिन्नतांमधूनदेखील समाजपरिवर्तन, आंतर्बाह्य स्थित्यंतर होत आहे. कारण, त्यांच्यामध्ये चौपदरी अस्वस्थता आहे (नेतृत्वाचं अभिसरण, स्त्रीमुक्तीचा प्रारंभ, सामाजिक आधारांची पक्षीय स्पर्धा, सामाजिक संबंधांचे बदलते ताणेबाणे). या चौपदरी अस्वस्थेचं प्रतिबिंब क्रांती मोर्चांमध्ये उमटलं. त्यांचा आढावा हा लोकशाहीकरण, स्त्रीनं ओलांडली लक्ष्मणरेषा, सत्ता आणि सत्तावंचित व सत्तेच्या सामाजिक संबंधांची फेरजुळणी, या चौकटीत घेतला आहे. 

मराठा क्रांती मोर्चे हे जागतिकीकरणाच्या रौप्यमहोत्सवी वर्षात सुरू झाले आहेत. त्यांचा थेट संबंध डिजिटल युगाशी आणि लोकशाहीकरणाशी दिसतो. 'संगणक अन्न-धान्य तयार करू शकतो का?' असा प्रश्‍न 1990 च्या दशकात लोकप्रतिनिधी उपस्थित करत होते; परंतु पुढं संगणकाच्या प्रगतीमधून डिजिटल क्रांती झाली. त्या डिजिटल क्रांतीनं आर्थिक, सामाजिक, राजकीय अशा अनेक क्रांतींना जन्म दिला. डिजिटल क्रांतीच्या आधारे नरेंद्र मोदी यांनी व अरविंद केजरीवाल यांनी राजकीय सत्तांतराची क्रांती घडवली.

केजरीवाल दिल्लीमध्ये शिक्षण-पाणी-वीज या साधनसंपत्तीच्या न्याय्यवाटपाच्या क्रांतीचा विचार डिजिटल माध्यमातून मांडत होते. महाराष्ट्रात भ्रष्टाचारविरोधी क्रांती डिजिटल माध्यमातून घडली. तिचं रूपांतर सरतेशेवटी सत्तांतरात झालं (2014). अशा डिजिटल युगातली घडामोड म्हणून मराठा क्रांती मोर्चा ही महत्त्वाची घटना आहे. अशी घडामोड घडवण्याची क्षमता डिजिटल क्रांतीविना अशक्‍य होती, याचं आत्मभान मराठा अभिजन आणि मध्यमवर्गीय मराठ्यांना असेल. मथितार्थ असा, की मराठा मोर्चामधला ताकदीचा व लोकशक्तीच्या एकत्रीकरणाचा संबंध डिजिटल क्रांतीशी जोडलेला आहे.

राजकीय पक्ष, मराठा अभिजन, मध्यमवर्गीय मराठा संघटना सातत्यानं मराठ्यांचं 'एकसंधीकरण' करण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या प्रयत्नांना एवढा मोठा प्रतिसाद गेली पाच-साडेपाच दशकं मिळाला नाही. किंबहुना 1980 च्या दशकात मराठा महासंघाला प्रतिसाद सर्वसामान्यांमधून मिळाला नव्हता. 1990 च्या दशकात मराठा सेवा संघापासून काही मराठे दूर राहिले, तर दोन्ही कॉंग्रेस पक्षांच्या बाहेर सर्वसामान्य मराठा मतदार गेला होता. हा सर्व सुस्पष्टपणे दिसणारा इतिहास आहे. अशा या एकसंधीकरणाच्या थकलेल्या व कोलमडलेल्या पार्श्‍वभूमीवर मराठा क्रांती मोर्चा जागतिक विक्रम करत आहेत. याचं खरं कारण डिजिटल क्रांती हे आहे. या डिजिटल क्रांतीमुळं अभिजनांखेरीज मध्यम वर्ग आणि सर्वसामान्य वर्गाला ताकद मिळाली आहे. त्यांच्यामध्ये आत्मविश्‍वास आला आहे, म्हणून अभिजनांचे सत्तेचे बाल्लेकिल्ले डिजिटल क्रांतीमुळं खिळखिळे होत आहेत. अभिजनांची निर्णयनिश्‍चितीची सत्ता नाकारली जात आहे. याची ठळक चार उदाहरणं मोर्चामध्ये दिसतात.

एक : सर्वसामान्य मराठा अभिजन मराठ्यांच्या विरोधात गेला आहे, ही गोष्ट मराठा अभिजनांनी जवळजवळ मान्य केली आहे. म्हणून ते मोर्चामध्ये सरतेशेवटी भाग घेतात. मोर्चाच्या आरंभी ते दिसत नाहीत.

दोन : मोर्चामधली विषयपत्रिका व त्यावर चर्चा करण्याचा अधिकार मोर्चाच्या संयोजकांचा आहे, हे राधाकृष्ण विखे पाटील यांनी नगर इथं मान्य केलं होतं.

तीन : अभिजन मराठ्यांना पुणे, नगर, बुलडाणा, कोल्हापूर, सातारा, सांगली इथं सुस्पष्ट विरोध सर्वसामान्य मराठ्यांनी केला.

चार : जातीच्या प्रश्‍नात अभिजन मराठा फार लक्ष घालत नव्हते. मराठ्यांच्या जातकेंद्रित कार्यक्रमांना ते अनुपस्थित राहत असत. मात्र, मोर्चामधल्या लोकशक्तीचा दबाव पाहून त्यांनी त्यांच्या कामाचा इतिहास मराठाकेंद्रित पद्धतीनं मांडायला सुरवात केली, तसंच मोर्चामध्ये हजेरी लावणं आणि मोर्चाला मदत म्हणून पैसे देणं, स्वतःला सेवक समजणं किंवा कार्यकर्ता म्हणून नव्यानं ओळख ठसवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून करण्यात आला. राधाकृष्ण विखे पाटील व भाई जगताप यांनी अशी मांडणी ठळकपणे केली. हा फेरबदल मराठा नेतृत्वामध्ये मोर्चामुळं झाला. याला डिजिटल क्रांतीनं ताकद पुरवली आहे. या मोर्चामुळं मराठा सत्तेचा निर्णयनिश्‍चितीचा चेहरा बऱ्यापैकी बदलला गेला.

या बदलाचा परिणाम राजकीय घराण्यांवरदेखील झाला आहे. पैसे आणि धाकदपटशाही या दोन गोष्टींवर त्यामुळं मर्यादा येणार आहेत. या दोन गोष्टींच्या वापराला विरोध झाला आहे. याचं श्रेय अर्थातच डिजिटल क्रांतीला जातं. याअर्थी ही लोकशाहीकरण करणारी प्रक्रिया घडलेली आहे. लोकशाहीच्या संख्येबरोबर तिची पाळंमुळं विस्तारणार आहेत. जनशक्तीचा दबाव वाढण्याखेरीज नवीन मराठा मध्यमवर्ग राज्यकर्ते होण्याचा विचार करत आहे. त्यामुळं अभिजनांमध्येदेखील अभिसरण होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

थोडक्‍यात, सरंजामी अभिजन वर्गाच्या जागी नवीन मध्यमवर्गीय मराठा अभिजन म्हणून प्रवेश करण्याची तीव्र इच्छाशक्ती व्यक्त करत आहे. प्रस्थापित मराठा अभिजन आणि मध्यमवर्गीय मराठा अभिजन यांच्यामध्ये देवाण-घेवाण होत होती; परंतु त्या देवाण-घेवाणीबरोबर सुस्पष्ट विरोध नोंदवले जात होते. ही प्रक्रिया 1990 च्या दशकापासून सुरू आहे. मध्यमवर्ग शिवसेना-भारतीय जनता पक्ष मतं देतो, याचं एक महत्त्वाचं कारण, त्यांचा प्रस्थापित अभिजनांच्या सार्वजनिक धोरणाला आणि हितसंबंधाना सुस्पष्ट विरोध होता. 1990 नंतर सेवा व्यवसायामधून मराठा समाजातला मध्यमवर्ग घडत गेला (छोटे उद्योग, सेवा क्षेत्रांतल्या एजन्सी, डॉक्‍टर, वकील, प्राचार्य, व्यवस्थापक, न्यायाधीश). या समाजाची समाजबदलाची संकल्पना नवीन आहे. त्यांना समाजकारणाखेरीज राजकारणदेखील करायचं आहे. म्हणून हा वर्ग मुळापासून प्रस्थापित अभिजनांच्या विरोधी भूमिका घेत आहे. म्हणजेच राजकारणाची जागा कृषी क्षेत्रातल्या मराठ्यांमधून बाहेर पडून ती सध्या मध्यमवर्गीय मराठ्यांकडं वळत आहे. तिला वळवण्याचा मोर्चामध्ये प्रयत्न केला जात आहे. ही प्रक्रिया राजकारणाला सरंजामी चौकटीमधून आधुनिक चौकटीकडं वळवणारी ठरते. यामध्ये परंपरा व आधुनिकता यांची सरळमिसळ दिसेल. कारण, परंपरेतून आधुनिकतेमध्ये सरळ जाता येत नाही. काही गोष्टी या परंपरेच्या सावलीसारख्या बरोबर येत राहतात. त्यामुळं इथं परंपरेतल्या विविध गोष्टी असल्या तरी आधुनिकतेकडं ही वाटचाल सुरू आहे. या अर्थानं ही लोकशाहीकरणाची प्रक्रिया आहे. 

('सकाळ प्रकाशना'च्या 'शब्ददीप' दिवाळी अंकात हा लेख प्रसिद्ध झालेला आहे. लेखक राज्यशास्त्राचे प्राध्यापक आणि राजकीय भाष्यकार आहेत.)