दानवे यांच्याविरोधात संताप

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 12 मे 2017

राज्यभरात उग्र निदर्शने, सोशल मीडियातून "लाखोली'

राज्यभरात उग्र निदर्शने, सोशल मीडियातून "लाखोली'
मुंबई - भाजपचे प्रदेशाध्यक्ष, खासदार रावसाहेब दानवे यांच्या विरोधात गुरुवारी राज्यभरात संताप व्यक्त होत होता, तसेच उग्र निदर्शने सुरू होती. शिवसेनेने "जोडे मारो' आंदोलन करीत दानवे यांच्या शेतकरीविरोधी वक्‍तव्याचा समाचार घेतला, तर सोशल मीडियात स्वंतत्रपणे "ट्रेंड' चालवित नेटिझन्सनी अक्षरशः दानवे यांना लाखोल्या वाहिल्या. विरोधी पक्षानेही दानवे यांच्याबाबत तीव्र संताप व्यक्‍त करीत भाजपने त्यांची हकालपट्‌टी करावी, अशी मागणी केली. राज्यभरातील शेतकऱ्यांनी देखील दानवे यांच्या वक्‍तव्याचा निषेध केला.

शेतकऱ्यांची एक लाख क्‍विटंल तूर खरेदी केली तरी कायम रडगाणे सुरू असल्याचे म्हणत दानवे यांनी शिवराळ भाषेत शेतकऱ्यांच्या भूमिकेबाबत धक्‍कादायक वक्‍तव्य बुधवारी (ता. 10) जालना येथे केले होते. त्यांच्या वक्‍तव्यातील "साले' हा शब्द पकडून सोशल मीडियावर हॅशटॅग "सालेदानवे' असा ट्रेंड आज दिवसभर सुरू होता. फेसबुक व ट्विटरवर दानवे यांच्या वक्‍तव्याचा जोरदार निषेध सुरू असतानाच भाजपची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू होते. आजपर्यंत कायम भाजप समर्थकांचा सोशल मीडियातला "ट्रेंड' उच्चांक गाठत असताना दानवे यांच्या विरोधातील "ट्रेंड'वरून मात्र भाजप व समर्थक बॅकफूटवर गेल्याचे दिसत होते. दानवे यांचा निषेध करणाऱ्या चारोळ्या, कविता, भावना, भूमिका व काही व्यंग्यचित्रांनी शेतकऱ्यांची बाजू उचलून धरली होती. भाजप नेते व कार्यकर्त्यांची देखील याविषयी बोलण्यास अडचण होत होती.

शिवसैनिकांनी आज सकाळपासून राज्यभरात दानवे यांच्या पुतळ्यांचे दहन केले. "जोडे मारो' आंदोलन करत रोष व्यक्‍त केला. तर, सोशल मीडियावर नेटिझन्सने दिवसभर दानवे यांना लक्ष्य करत हकालपट्‌टीची मागणी केली. बळिराजाला शिवीगाळ करणाऱ्या पक्षाला व नेत्याला जनता धडा शिकवेल, असा सूर या सर्व आंदोलनांतून दिसत होता.
दरम्यान, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दानवे यांची भाषा "दानवा'सारखी असल्याची टीका केली. कॉंग्रेस दानवे यांच्या विरोधात राज्यभर आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी या वेळी दिला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही दानवे यांच्या वक्‍तव्यावर संताप व्यक्‍त करताना, ही सत्तेची मस्ती असल्याची टीका केली. भाजपचा शेतकरीविरोधी चेहरा समोर आला असून, दानवे यांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार उरलेला नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी तर दानवे यांच्या तोंडाला काळे फासणार असल्याचा इशारा दिला आहे.

महाराष्ट्र

पाच लाखांची गरज; मदतीसाठी पुढे येण्याचे दानशूरांना आवाहन औरंगाबाद - महाविद्यालयात शिकत असताना महाविद्यालयीन विविध उपक्रमांत...

03.54 PM

पुणे - ‘सकाळ इन्व्हेस्टिगेशन टीम’चे (एसआयटी) वरिष्ठ बातमीदार गोविंद तुपे यांना; तसेच ‘सकाळ’च्या मुंबई आवृत्तीचे बातमीदार...

06.33 AM

मुंबई -शेतकरी कर्जमाफीसाठी राज्य सरकारला नव्याने कर्ज घ्यावे लागणार असून, 20 हजार कोटींच्या कर्जासाठी केंद्र सरकारने राज्य...

04.48 AM