कामकाज रोखण्याचा अधिकार विधान परिषदेला नाही : अनिल गोटे

संजीव भागवत
गुरुवार, 30 मार्च 2017

आम्ही जनतेमधून प्रत्यक्ष निवडून येतो. विधान परिषदेतील सदस्य अप्रत्यक्ष निवडून येतात. मात्र, हे सदस्य सरकारची गळचेपी करत असून ही परिषद बरखास्त करावी

मुंबई: 'आम्ही केलेले कामकाज रोखून धरण्याचा कोणताही घटनात्मक अधिकार नसलेले लोक विधान परिषदेत बसलेले आहेत. विधानसभेतील कामकाज विधान परिषद रोखून धरते. त्यामुळे ही परिषद बरखास्त करावी,' अशी मागणी भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी आज (गुरुवार) दुसऱ्या दिवशीही लावून धरली. 

अनिल गोटे म्हणाले, "आम्ही केलेले कामकाज रोखून धरण्याचा विधान परिषदेला घटनात्मक अधिकार नाही. असे करून विधान परिषद 12 कोटी जनतेचा अपेक्षाभंग करत आहेत. त्यांना अटकाव केला पाहिजे. 'परिषद बरखास्त करावी,' अशी मागणी यापूर्वीही दोनदा केलेली आहे.'' रामभाऊ म्हाळगी यांनी 25 जुलै 1961 रोजी विधान परिषद बरखास्त करण्यासाठी भाषण केले होते. त्यातील काही ओळीही अनिल गोटे यांनी वाचून दाखविल्या. 

'आम्ही जनतेमधून प्रत्यक्ष निवडून येतो. विधान परिषदेतील सदस्य अप्रत्यक्ष निवडून येतात. मात्र, हे सदस्य सरकारची गळचेपी करत असून ही परिषद बरखास्त करावी,' अशी मागणी गोटे यांनी केली. दरम्यान, तालिका अध्यक्ष योगेश सागर यांनी 'हा विषय सभागृहाचा नाही' असे अनेकदा स्पष्ट केले; मात्र गोटे यांनी आपले भाषण सुरूच ठेवले. 

'विधान परिषद ही एक ऐतिहासिक अपघात असल्याचे रामभाऊ म्हाळगी म्हणाले होते,' असे सांगत गोटे यांनी 'ही परिषद आपण केवळ पाश्‍चात्यांचे अंधानुकरण करण्यापलीकडे दुसऱ्या कोणत्याही हितासाठी सुरू ठेवलेली नाही,' असा दावाही त्यांनी केला. 

Web Title: Anil Gote demands to dissolve Vidhan Parishad