राज्यातील कला शिक्षकांवर अतिरिक्तची टांगती तलवार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 मे 2017

सोलापूर - यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सरकारने कला व क्रीडा या विषयांच्या तासिका चार वरून दोनवर आणल्या आहेत. त्याचा फटका राज्यातील साडेचार हजार कला शिक्षकांना बसणार आहे. तासिका कमी केल्यामुळे या शिक्षकांच्या डोक्‍यावर अतिरिक्तची टांगती तलवार उभारली आहे. 

शिक्षण विभागाने तासिकांची पुनर्रचना केली आहे. त्याची अंमलबजावणी यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सुरू होईल. कला विषयाच्या तासिका कमी करताना सरकारने विद्वत परिषदेला किंवा संबंधित विषयाच्या अभ्यास मंडळाच्या सदस्यांना विश्‍वासात न घेता निर्णय घेतला आहे. 2012 मध्ये पुनर्रचित झालेल्या प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम आठवीपर्यंत पूर्णतः लागू झालेला नसताना शालेय वेळापत्रकातील 50 तासिकांच्या संख्येवरून दर आठवड्याला 45 तासिकांचे नियोजन केले आहे. 

वास्तविक कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षक या विषयांना प्रात्यक्षिकदृष्ट्या फार महत्त्व आहे. प्रात्यक्षिकातून अध्यापन करायचे असल्यामुळे इतर विषयांपेक्षा या विषयाला जादा तास असणे आवश्‍यक आहे. मात्र, या विषयाला सरकारने दुय्यम दर्जा दिल्याचे यावरून स्पष्ट होते. या विषयाच्या तासिका कमी केल्याने कला शिक्षकांना अतिरिक्त दाखविण्याचे प्रयत्न होत आहेत. याचा फटका राज्यातील जवळपास साडेचार हजार शिक्षकांना बसण्याची शक्‍यता आहे.