आश्रमशाळा सुविधांअभावी पोरक्‍याच

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 मे 2017

राज्यांमध्ये 15 वर्षांत एक हजार 77 मुलांचा मृत्यू
मुंबई - राज्यातील बहुतांश आश्रमशाळांची दुरवस्था झाली असून, गेल्या 15 वर्षांत राज्यातील आश्रमशाळांतील एक हजार 77 मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. आश्रमशाळांमध्ये सोईसुविधांचा तुटवडा असून, शाळांमध्ये महिला अधिक्षकांची पदे रिक्त आहेत.

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना दिले जाणारे निकृष्ट अन्न, दूषित पाणी, नादुरुस्त शौचालये, वैद्यकीय सुविधांचा अभाव; तसेच सर्पदंशासारख्या घटना यामुळे मुलांचा मृत्यू झाल्याचे "माहिती अधिकारा'त उघड झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे या ठिकाणच्या मुलींना नदी किंवा ओढ्याच्या ठिकाणी अंघोळीला; तसेच शौचाला जावे लागते. त्यांना सकस आहार मिळत नाही.

बऱ्याचदा वीज नसल्याने अंधारात राहावे लागते. वसतिगृहातील अस्वच्छतेमुळे मुले आजारी पडत असल्याचे निदर्शनास येत आहे. याचसोबत इमारत दुरुस्ती, नवीन इमारतीची बांधकामे यांसारखी कामेही प्रलंबित आहेत. 2016-17 या शैक्षणिक वर्षात दोन लाख विद्यार्थ्यांना शालेय गणवेश आणि साहित्य मिळालेले नाही. या सगळ्यावर लक्ष ठेवण्यासाठी प्रकल्प अधिकारी आहे; मात्र त्यांच्या कामाचा आवाका पाहता या सगळ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ते अपुरे पडत असल्याचे दिसून येते.

नियमानुसार आश्रमशाळेतील मुलांची 20 प्रकारच्या आजारांची तपासणी होणे आवश्‍यक आहे; तसेच त्यांच्यात कोणते व्यंग किंवा दोष नाहीत ना, याची पडताळणी होणेही आवश्‍यक आहे. ही प्रक्रिया केवळ औपचारिकता म्हणून केली जाते, अशी माहिती उघड झाली आहे.