रावसाहेब दानवे, जनता तुम्हाल रडवेल!

Blog by Yogesh Kute
Blog by Yogesh Kute

रावसाहेब दानवे हे आपल्या जालना जिल्ह्यातच बरळले. शेतकऱ्यांची सरकारने एवढी तूर खरेदी करूनही ते रडतात साले, असे वाक्‍य त्यांनी वापरले. पक्षाचा कार्यकर्ता त्यांना सहजपणे विचारत होता की साहेब तुरीच्या प्रश्‍नावरून शेतकरी सरकारवर नाराज आहेत. दानवे यांचे तेवढ्यावरून पित्त खवळले. सरकारने विक्रमी खरेदीचा दावा करताना ते शेतकऱ्यांवर घसरले. कार्यकर्त्यांनी आक्रमकपणे प्रत्युत्तर द्यावे, असेही त्यांनी कार्यकर्त्याला सुनावले. सरकारने विक्रमी खरेदी केल्याचा दानवे यांचा दावा अर्धवट आहे.

विक्रमी तूर जरूर खरेदी केली. पण ही वेळ आणली कोणी? तुरीचे उत्पादन हे बंपर होणार, हे सांगायला दानवे यांच्या भाजपला ब्रह्मदेवाच्या निरोपाची गरज होती का? सरकारने आवाहन केल्यानंतर शेतकऱ्यांनी भरपूर तूर लावली.

सुदैवाने चांगले उत्पादन झाले. मात्र जून ते डिसेंबरपर्यंत सहा महिने सरकार झोपले. तुरीवरील आयात शुल्क वाढविले नाही. तूर निर्यात करण्यासाठी आधीच पावले उचचली नाहीत. सार्वजनिक पुरवठा व्यवस्थेतून ग्राहकांना तूर रास्त भावात देण्याची व्यवस्था केली नाही. साधा बारदाणा सरकार वेळेवर उपलब्ध करून देऊ शकले नाही. तूर सरकारी विक्री केंद्रावर देण्यासाठी शेतकऱ्याचे हाल झाले. त्याला तूर विक्रीसाठी मधल्या व्यवस्थेने लाच द्यायला भाग पाडले. तूर प्रश्‍नाचा सारा खेळखंडोबा या सरकारने केला. कोणतेही दूरदर्शी धोरण आखले नाही. आधीच्या सरकारप्रमाणे डोळ्यावर कातडे पांघरले आणि आता रावसाहेब म्हणतात... 'रडतेत साले!' 

भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून शेतीकडे दुर्लक्ष झाले आहे, हे वेगळे सांगायला नको. कांदा, तूर, ऊस, कापूस या सर्व उत्पादनांचे भाव गडगडले आहेत. आधारभूत किंमत वाढविल्याचा सरकारचा दावा पोकळ आहे. त्यामुळे एकटे तूर उत्पादक शेतकरीच नव्हेत तर इतरांचीही अवस्था वाईट झाली आहे. नोटाबंदीनंतर शेतकऱ्यांना कवडीमोल किमतीने माल विकावा लागला. तेव्हा शेतकरी खरोखरीच रडत होता. तेव्हा दानवे काही मदतीला धावून आले नाही. ऊस उत्पादकांचे पैसे रखडले. तेव्हा दानवे काही बोलत नाहीत. सरकारची धोरणे शेतीविरोधी असूनही रावसाहेब म्हणतात...रडतेत साले! 

शेतकऱ्यांच्या आत्हमत्येबद्दल आता भरपूर बोलून आणि लिहून झाले आहे. भाजपने या मुद्यावरून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला झोडपत होते. शेतकऱ्यांचे उत्पन्न पाच वर्षात दुप्पट करण्याचे आश्‍वासन मोदी सरकारने दिले होते. ते तर पूर्ण झाले नाहीच. उलट भाव घसरून त्यांचे उत्पन्न कमी झाले. त्यामुळे मोदी आणि फडणवीस सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच राहिल्या. शेतीतील गुंतवणूक वाढविण्याचे आमचे काम सुरू आहे, अशी कंठशोष फडणवीस सरकार करीत आहे. जलयुक्त शिवारशिवाय सरकारने शेतीत वेगळे काहीच केलेले नाही. जलयुक्त शिवार योजनाही आता कंत्राटदाराच्या अधीन झाली आहे. शेतकऱ्यांच्या पोरांना एसटीच्या पाससाठी पैसे नाहीत म्हणून आपले जीवन संपवत आहेत. तरीही रावसाहेब म्हणतात...रडतेत साले! 

शेतकऱ्यांची कर्जमाफी द्यावी की नाही, हा मुद्दा वादाच असू शकतो. सत्तेत नसताना भाजप सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची ग्वाही दिली होती. सत्तेत आल्यानंतर हेच फडणवीस आता म्हणत आहेत की आमचा कर्जमाफीबद्दल आमचा अभ्यास सुरू आहे. वेगळ्या अर्थाने तुम्ही शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. दानवे तर याच्या पुढे गेले. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्यानंतर त्यांच्या आत्महत्या थांबतील, याची ग्वाही विरोधी पक्षाने दिली पाहिजे. तुम्ही सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्याचा गळा केसाने कापणार, अशी हमी शेतकऱ्यांना लिहून दिली होती का? तुम्ही नाही म्हणाल. पण तुमचे वर्तन आता तेच सांगत आहे. सत्तेत आल्यानंतर तुम्ही शेतकऱ्यांना धोका दिला. तरी रावसाहेब म्हणतात, रडतात साले! 

रावसाहेब दानवे, तुम्ही अच्छे दिनचे आश्‍वासन दिले होते. तुम्ही विसरला असाल. पण याच शेतकऱ्याने तुमच्यावर विश्‍वास ठेवला. त्याचा तुम्ही विश्‍वासघात करताय. तरी तुम्हीच त्याला नावे ठेवता आणि म्हणता, 'रडतात साले!' 

अशा बेताल बोलणाऱ्यांना महाराष्ट्रातील जनतेने धडा शिकवलेला आहे. उजनीच्या पाण्यावरून मुतण्याची भाषा करणारे अजित पवार यांना आता सत्तेविना राहावे लागत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही 1995 मध्ये सत्तेत आल्यानंतर काही मुक्ताफळे उच्चारली होती. त्यानंतर शिवसेना अद्याप सत्तेत आलेली नाही. तुम्ही भाजपवाले मोदी यांच्या पुण्याईमुळे दोन खासदारांवरून 283 खासदारांवर पोचले आहात. पण 283 वरून घसरगुंडी सुरू व्हायला वेळ लागणार नाही. तेव्हा तुम्हाला रडावे लागेल. तेव्हा भाजपचे रावसाहेब रडतात, अशी जनता म्हणेल. 'भाजपवाले रडतेत साले, असे काही तुम्हाला त्यावेळी म्हणणार नाही. कारण ती आमची संस्कृती नाही. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com