कॅनडाची गुंतवणूक राज्यात वाढणार

Investment
Investment

मुंबई - महाराष्ट्र आणि कॅनडाच्या क्‍युबेक प्रांतातील आर्थिक सहकार्य अधिक दृढ होणार असून माहिती-तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, एरोनॉटिक्‍स, ऊर्जा, आर्टिफिशियल इंटिलिजन्स आणि आदिवासी कल्याण आदी क्षेत्रातील व्यापक सहकार्याबाबतच्या महत्त्वपूर्ण सामंजस्य करारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि क्‍यूबेकचे पंतप्रधान फिलिप क्‍युलार्ड यांनी बुधवारी स्वाक्षरी केली. यासोबतच निधी व्यवस्थापनातील सीडीपीक्‍यू या संस्थेसह बॉम्बार्डिअर या उद्योगाने महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे शिष्टमंडळ सध्या कॅनडाच्या दौऱ्यावर आहे. मॉन्ट्रियल येथे आज मुख्यमंत्र्यांनी क्‍युलार्ड यांची भेट घेतली. या भेटीत विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात तरुणांची संख्या असून पुढच्या काळात त्यांना अधिकाधिक रोजगारसंधी उपलब्ध करून देण्यासाठी बंदर क्षेत्रामध्ये आर्टिफिशियल इंटिलिजन्स तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करणे आवश्‍यक आहे. त्यादृष्टीने महाराष्ट्र आणि क्‍युबेक प्रांत यांच्यात आर्टिफिशियल इंटिलिजन्स तंत्रज्ञानाच्या व्यापक प्रमाणावरील आदानप्रदानासंदर्भात अतिशय सकारात्मक चर्चा झाली. या चर्चेनंतर उभय प्रांतातील आर्थिक सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या वेळी क्‍युबेकच्या आंतरराष्ट्रीय व्यवहार मंत्री क्रिस्टिन सेंट पेरी यांची प्रमुख उपस्थिती होती.

सीडीपीक्‍यूचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मायकेल साबिया यांचीही मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली. कॅनडातून अधिकाधिक पेन्शन फंड गुंतवणूक भारतात यावी, हा या भेटीमागचा हेतू होता. भारतातील काही संस्थांशी भागिदारी करण्याबरोबरच रिटेल व्यावसायिकांसोबत काम करण्याचा "सीडीपीक्‍यू'चा मानस आहे.

राज्याच्या शिष्टमंडळाने सायंकाळी परिवहन क्षेत्रात जागतिक पातळीवरील आघाडीच्या विमान आणि रेल्वे उत्पादक कंपनी असलेल्या बॉम्बार्डिअरच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष आणि कंपनीप्रमुख पिअरी ब्युदॉं यांची भेट घेतली. या वेळी झालेल्या चर्चेत महाराष्ट्रातील मेट्रोसह परिवहनविषयक पायाभूत सुविधा क्षेत्रात सहकार्य करण्याची तयारी या कंपनीकडून दाखविण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com