व्यंग्यचित्रकलेकडे करिअर म्हणून पाहा

अरविंद रेणापूरकर : सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 6 मार्च 2017

अभिजित किणी यांचा सल्ला; कॉमिक कॉनच्या माध्यमातून कलेला अधिक वाव 

अभिजित किणी यांचा सल्ला; कॉमिक कॉनच्या माध्यमातून कलेला अधिक वाव 

पुणे, : आजकाल आपण खूपच गंभीर होत चाललो आहोत. आपल्यातून हसणे कमी होऊ लागले आहे. आपण हसायला शिकले पाहिजे. माणसांना हसवण्याची आणि आनंद देण्याची ताकद व्यंग्यचित्रात असते, असे मत व्यंग्यचित्रकार अभिजित किणी यांनी व्यक्त केले. करिअर म्हणूनही व्यंग्यचित्रकलेकडे पाहिले पाहिजे. केवळ डॉक्‍टर आणि इंजिनिअरचा आग्रह करणाऱ्या पालकांनी याचा विचार करावा, असा सल्ला किणी यांनी या वेळी दिला. आपल्याकडे व्यंग्यचित्रकारांची मोठी परंपरा आहे. ही परंपरा पुढे चालू राहण्यासाठी युवकांनी, विद्यार्थ्यांनी करिअर म्हणूनही व्यंग्यचित्रकलेकडे पाहिले पाहिजे, असेही किणी म्हणाले. 

पुण्यातील डेक्कन कॉलेजच्या परिसरात कॉमिक कॉन परिषदेचे आयोजन केले होते. दोन दिवस रंगलेल्या या परिषदेत शालेय विद्यार्थ्यांपासून ते कॉलेजमधील तरुण, ज्येष्ठांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. कॉसप्ले, व्यंग्यचित्रकला स्पर्धा, विविध व्हिडिओ गेम्स आदींनी मनोरंजनाची रेलचेल असलेल्या कॉमिक कॉनला पुणेकरांनी जोरदार हजेरी लावली. या कॉमिक कॉनमध्ये सहभागी झालेले व्यंग्यचित्रकार अभिजित किणी यांनी आपले विचार मांडले. कॉमिक कॉनमुळे नव्या व्यंग्यचित्रकाराला व्यासपीठ मिळाल्याचे सांगत किणी म्हणाले, की मुलांमध्ये वाचनाची सवय कमी होत आहे. नव्या पिढीतील बहुतांश मुलांना मराठीतील नामवंत साहित्यिकांची नावे माहीत नाहीत, लेखन माहीत नाही, हे कटू सत्य आहे. कॉमिक कॉनसारख्या परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थिदशेतील मुलांना वाव मिळतो, कॉमिक्‍स क्षेत्रातील होणारे बदल यातून आपल्याला कळतात आणि भविष्यात यात आणखी वाढ होईल, यात शंका नसल्याचे त्यांनी नमूद केले. लहान मुलांना चित्र काढायला प्रोत्साहन द्यायला हवे. मुलांना कथा लिहू द्या. त्यांनी विकसित केलेली कार्टून कॅरेक्‍टर काढाण्यासाठी मदत करा, असा सल्लाही किणी यांनी पालकांना दिला. सध्या वास्तवेत गांभीर्य खूपच वाढले आहे. विनोद हरवत चालला आहे. अगदी लहान मुलेही गंभीर चेहरे करून उभी असतात. हे चित्र बदलण्यासाठी व्यंग्यचित्र आणि कॉमिक्‍स मोलाची भूमिका बजावतात, असे ते म्हणाले. 

राजकीय व्यंग्यचित्र धोकादायक ठरतेय 
पूर्वी राजकीय व्यंग्यचित्र काढताना कोणतेही दडपण व्यंग्यचित्रकारावर नसायचे. वर्तमान राजकारणावर भाष्य करणारे कार्टून प्रसिद्ध व्हायचे आणि त्यास प्रतिसादही प्रचंड मिळायचा; परंतु आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. राजकारणाची घुसखोरी झाल्याने राजकीय व्यंग्यचित्रांचे प्रमाण कमी झाले आहे. राजकीय व्यंग्यचित्र काढणे हल्ली धोक्‍याचे होत चालले आहे, अशी खंत अभिजित यांनी व्यक्त केली. 
 

Web Title: cartoonist as career : abhijeet kini