चंद्रपूर, लातूर, परभणीत भाजपचे आव्हान 

सिद्धेश्‍वर डुकरे
बुधवार, 5 एप्रिल 2017

मुंबई - राज्यातील चंद्रपूर, लातूर आणि परभणी महापालिकांची निवडणूक येत्या 19 एप्रिल रोजी होणार आहे. या वेळी चंद्रपूर, लातूर येथे कॉंग्रेस, तर परभणीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची कसोटी लागणार आहे. या तीन महापालिकांत मागील निवडणुकीत केवळ वीस जागा मिळवणाऱ्या भाजपला या वेळी गमावण्यासारखे काहीच नाही. झाली तर भाजपच्या कामगिरीत सुधारणा होण्याचीच शक्‍यता आहे. 

मुंबई - राज्यातील चंद्रपूर, लातूर आणि परभणी महापालिकांची निवडणूक येत्या 19 एप्रिल रोजी होणार आहे. या वेळी चंद्रपूर, लातूर येथे कॉंग्रेस, तर परभणीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची कसोटी लागणार आहे. या तीन महापालिकांत मागील निवडणुकीत केवळ वीस जागा मिळवणाऱ्या भाजपला या वेळी गमावण्यासारखे काहीच नाही. झाली तर भाजपच्या कामगिरीत सुधारणा होण्याचीच शक्‍यता आहे. 

केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. याचा फायदा उठवत भाजपने नुकत्याच झालेल्या नगर परिषदा, पंचायत समित्या, जिल्हा परिषदा, महापालिका यांच्या निवडणुकीत विरोधकांना चीत करत क्रमांक एकचे स्थान पटकावले. आता लातूर, चंद्रपूर, आणि परभणी महापालिका निवडणुकांत कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा कस लागणार आहे, तर सत्ताधारी भाजपचे आव्हान राहणार आहे. 2012 मध्ये लातूरमध्ये भाजपला एकही जागा मिळाली नव्हती; मात्र या चार वर्षांत भाजपने लातूरमध्ये कॉंग्रेसला शह देत जिल्हा परिषदेवर ताबा घेतला. दिवंगत माजी मंत्री विलासराव देशमुख घराण्याची सद्दी संपविताना कामगारमंत्री संभाजी निलंगेकर यांनी कॉंग्रेसच्या अमित देशमुख यांच्यावर मात केली. आताही अर्थसंकल्पी अधिवेशन सुरू असतानाही संभाजी निलंगेकर लातुरात तळ ठोकून आहेत. त्यामुळे अमित देशमुखांना आव्हान निर्माण झाले आहे. 

लातूरप्रमाणे चंद्रपूर महापालिकेतही कॉंग्रेसला भाजपचे तगडे आव्हान असणार आहे. गेल्या वेळी चंद्रपूरमध्ये कॉंग्रेसने सर्वाधिक 26 जागा, तर भाजपने 18 जागा जिंकल्या होत्या. 

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांच्यापुढे विस्कळित कॉंग्रेसचा टिकाव लागणे मुश्‍कील आहे. परभणीत गेल्या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसने 30, तर कॉंग्रेसने 23 जागा जिंकत भाजपला केवळ दोन जागांवर मर्यादित ठेवले होते; मात्र मागील चार वर्षांत सध्याचा सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्या ताकदीत बराच फरक पडला आहे. सत्तेत असल्याचा लाभ उठवत भाजपने आपली ताकद वाढवली आहे. 

2012 मधील कामगिरी 
- चंद्रपूर- एकूण जागा- 66, भाजप- 18, राष्ट्रवादी कॉंग्रेस- 4, 
कॉंग्रेस पक्ष- 26, शिवसेना- 5 
- परभणी- एकूण जागा- 65,भाजप- 2, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष- 30, 
कॉंग्रेस- 23, शिवसेना- 8 
- लातूर- एकूण जागा- 70, भाजप- 0, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष- 13, 
कॉंग्रेस - 49, शिवसेना- 6 

Web Title: Chandrapur, Latur, BJP's challenge