नागरिकच निवडणार "प्रभावी नगरसेवक'! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 मे 2017

पुणे - प्रभागात स्वच्छता राखण्यासाठी तुमचे नगरसेवक किती प्रयत्न करतात, महापालिकांच्या शाळांमधली गळती रोखण्यासाठी त्यांनी ठोस उपाय केले आहेत का, त्यांनी फूटपाथ पादचाऱ्यांसाठी मोकळे केले आहेत का... या आणि अशा नागरिकांच्या दृष्टीने जिव्हाळ्याच्या प्रश्‍नांची समाधानकारक उत्तरे ज्या नागरिकांच्या प्रभागात मिळतील, तेथील नगरसेवक मानकरी ठरतील, "सकाळ'च्या प्रभावी नगरसेवक पुरस्काराचे. 

पुणे - प्रभागात स्वच्छता राखण्यासाठी तुमचे नगरसेवक किती प्रयत्न करतात, महापालिकांच्या शाळांमधली गळती रोखण्यासाठी त्यांनी ठोस उपाय केले आहेत का, त्यांनी फूटपाथ पादचाऱ्यांसाठी मोकळे केले आहेत का... या आणि अशा नागरिकांच्या दृष्टीने जिव्हाळ्याच्या प्रश्‍नांची समाधानकारक उत्तरे ज्या नागरिकांच्या प्रभागात मिळतील, तेथील नगरसेवक मानकरी ठरतील, "सकाळ'च्या प्रभावी नगरसेवक पुरस्काराचे. 

राज्याच्या विविध शहरांमध्ये जनसेवेची चांगली कामगिरी करणाऱ्या नगरसेवकांना "प्रभावी नगरसेवक पुरस्कार' देण्याची योजना "सकाळ'ने पुण्यातील नगरसेवकांच्या स्नेहमेळाव्यात नुकतीच जाहीर केली. तटस्थ नागरिकांची एक समिती सात निकषांच्या आधारे नगरसेवकांच्या कामगिरीचे परिक्षण करेल. या निकषांप्रमाणे अधिक गुण मिळविणाऱ्या नगरसेवकांना "प्रभावी नगरसेवक' पुरस्कार प्रदान करण्यात येईल. "सकाळ'च्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण होईल. 

प्रभावी नगरसेवक पुरस्कारासाठीचे निकष - 
1) प्रभाग स्वच्छता -- प्रभागात स्वच्छता राखण्यासाठी केलेले प्रयत्न 
अ) स्वच्छता उपक्रम -- नागरिकांनी कचरा रस्त्यावर फेकू नये, रस्ते आणि परिसर स्वच्छ राहण्यासाठी केलेले प्रयत्न 
ब) कचऱ्याचे वर्गीकरण -- नागरिकांनी घरातच ओल्या आणि कोरड्या कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी नगरसेवकांनी नागरिकांना प्रोत्साहित केले का? किती नागरिकांनी आपापल्या सोसायट्या, वाडे किंवा घरांत ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया सुरू केली आहे ? 
क) कचरावेचकांचे प्रमाण -- घरोघर फिरून कचरा वेचणाऱ्यांच्या प्रमाणातील वाढ आणि नगरसेवकांचा त्यातील सहभाग 
ड) प्रभाग पातळीवरील कचरा प्रक्रिया केंद्रे -- प्रभाग पातळीवरील कचरा प्रक्रिया केंद्रांना चालना देण्यासाठी झालेले प्रयत्न 
इ) सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्थिती -- प्रभागातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्थिती, महिलांसाठीच्या स्वच्छतागृहांचे प्रमाण, तसेच सशुल्क स्वच्छतागृहांचे प्रमाण 

2) वॉर्डस्तरीय निधीचा सुयोग्य वापर -- वॉर्ड किंवा प्रभागनिहाय निधीचा सुयोग्य वापर होतो आहे का, त्यातील पैसे व्यापक जनहितासाठी खर्च होत आहेत का ? 

3) सभागृहातील कामगिरी -- 
अ) नगरसेवकांनी महापालिका सभांमध्ये विचारलेले लेखी प्रश्‍न 
ब) नगरसेवकांची सभागृहातील उपस्थिती 

4) शैक्षणिक -- 
अ) महापालिकेच्या शाळांचा दर्जा सुधारण्यासंदर्भात नगरसेवकांचे प्रयत्न 
ब) विद्यार्थ्यांची संख्यावाढ झाली का, तसेच गळती कमी झाली का ? 
क) शाळांमधील स्वच्छतागृहांची, तसेच पाण्याची-देखभाल-दुरूस्तीची स्थिती कशी आहे ? 

5) वाहतूक -- 
अ) प्रभागातील अतिक्रमणे हटविण्यासाठी केलेले प्रयत्न 
ब) प्रभागातील पदपाथ पादचाऱ्यांसाठी मोकळे केले का ? 
क) प्रभागात सायकल ट्रॅक असल्यास त्यांची स्थिती 
ड) प्रभागातील कोंडी सोडविण्यासाठी केलेले प्रयोग 

6) प्रभागातील सुविधा -- 
अ) प्रभागातील ऍमेनिटी स्पेसचा सुयोग्य वापर झाला आहे का ? 
ब) प्रभागातील पाणीपुरवठ्याची स्थिती 

7) नागरिकांच्या तक्रारींचा पाठपुरावा -- 
नागरिकांच्या तक्रारींचा पाठपुरावा नगरसेवकांकडून कसा केला जातो आहे ?