परिवर्तनाकडे जाण्याचे डीसीएफ प्रभावी माध्यम - मुख्यमंत्री

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis

मुंबई - डिलिव्हरिंग चेंज फोरम हे केवळ चर्चेचे व्यासपीठ नाही. यातून परिवर्तनाचा कृती कार्यक्रम निश्चितपणे पुढे न्यायचा आहे. तरुणांची संख्या सर्वाधिक असलेल्या भारतात नव्या कल्पना अमलात आणण्याची हीच योग्य वेळ आहे. तळागाळातून निर्माण होणाऱ्या नवकल्पना धोरणकर्त्यांपर्यंत पोहचवून प्रत्यक्षात आणण्याचे प्रयत्न आपल्याला करायचे आहेत. यासाठी सरकारबरोबरच उद्योजक, स्वयंसेवी संस्था आणि विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांनी हातात हात घालून काम केले पाहिजे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

डिलिव्हरिंग चेंज फोरमचे उद््घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नेहरू सेंटर येथे झाले. त्या वेळी ते बोलत होते. लोकशाहीत अनेक गट विविध पातळ्यांवर काम करतात. त्यात अनेक जण चालकाचे काम करीत असतात. या कामांमागे वेगवेगळे सामाजिक, राजकीय हेतू असतात़़; परंतु सर्वांगीण विकासासाठी त्यांना एकत्र आणण्याची गरज आहे. या फोरमच्या माध्यमातून त्याचे रूपांतर एकत्रित प्रयत्नात करता येईल, असेही त्यांनी सांगितले.

भारतामध्ये ५० टक्के लोकसंख्या २७ पेक्षा कमी वयोगटाची आहे. ६५ टक्के लोकसंख्या पस्तिशीच्या आतील आहे. बदल घडवू शकणारा मोठा वयोगट भारतात आणि पर्यायाने महाराष्ट्रात आहे. या तरुण लोकसंख्येचा लाभ (डेमॉक्रेटिक डिव्हिडंड) घेतला पाहिजे. आजच्या तरुणांमध्ये बदल घडविण्याची क्षमता आहे. नवे तंत्रज्ञान, वेगवेगळ्या कल्पना राबविण्याची ताकद आहे. या मनुष्यबळाचा सकारात्मक वापर करून घेतला पाहिजे. अन्यथा डेमॉक्रेटिक डिझास्टर होऊ शकते. लोकसंख्येचा लाभ भारताला सदासर्वकाळ मिळणार नाही. २०१० मध्ये भारत सर्वाधिक तरुणांचा देश बनला आणि २०३५ पासून ही परिस्थिती  बदलण्यास सुरुवात होईल. आजही आपल्या हातात १७-१८ वर्षे आहेत, ज्या कालावधीत आपण बदल घडवू शकतो, याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले.  

महाराष्ट्रात सकारात्मक बदल घडविण्यासाठी एकूण १७ क्षेत्रे निवडण्यात आली आहेत. या शिक्षण, आरोग्य आदी १७ क्षेत्रांवर लक्ष दिल्यास महाराष्ट्रातच काय देशाच्या विकासाच्या आलेखात पुढील पाच-सात वर्षांत महत्त्वपूर्ण बदल होतील. त्यासाठी उत्तम प्रशासन आणि सकारात्मक विचारांची गरज अाहे, असे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले.

मुख्यमंत्र्यांकडून गौरव
डिलिव्हरिंग चेंज फोरमची कल्पना राबविण्याचे श्रेय अभिजित पवार यांचे आहे. अशा प्रकारे लोकांना एकत्र आणून परिवर्तन करणारे फोरम निर्माण करणे हे अराजकीय व्यक्तीने करायला हवे असे काम आहे. अभिजित पवार यांनी ते उत्तम प्रकारे केले आहे. डीसीएफ, यिन, तनिष्का यांसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थी, महिलांना एकत्र आणून त्यांनी समाजात बदल घडवून आणला आहे. हा पुढाकार म्हणजेच एक प्रकारचा बदल अाहे. त्याअंतर्गत अनेक लोक काम करीत आहेत, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांचा गौरव केला.

तरुण पिढीला शेतीशी जोडा
आज जागतिक तापमानवाढ, हवामान बदल यामुळे शेतीमध्ये बदल होत आहेत, त्यामुळे यापुढील काळात शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करीत असताना शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाबरोबर आणि तरुण पिढीला आधुनिक शेतीशी जोडले जाणे आवश्यक आहे. आजच्या उद्योजकांनी शेतीमध्ये गुंतवणूक करणे कसे उत्तम आणि फायदेशीर आहे, हे पटवून देणे आवश्यक आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.

२५०० गावांचा सर्वांगीण विकास
आज सामाजिक उत्तरदायित्वाखाली बहुतांश कंपन्या वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करीत आहेत. आरोग्य, शैक्षणिक, कौशल्य विकास आदी क्षेत्रांत काम करीत आहेत. राज्य शासनामार्फत पहिल्यांदाच एक हजार गावे एकत्र निवडली गेली आणि या गावांत सर्व प्रकारची कामे करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहेत. आता यापुढील काळात अडीच हजार गावांत सर्व सुविधा एकत्र आणण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com