कंपन्यांवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न नाही

वृत्तसंस्था
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016

मुंबई - टाटा समूहातील कंपन्यांवर नियंत्रण मिळविण्याचा माझा प्रयत्न सुरू आहे, हा आरोप धादांत खोटा, असा प्रतिवाद टाटा सन्सचे हकालपट्टी केलेले अध्यक्ष सायरस मिस्त्री यांनी रविवारी केला. टाटा सन्सकडून स्वतंत्र संचालकावर सुरू असलेली टीका दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मुंबई - टाटा समूहातील कंपन्यांवर नियंत्रण मिळविण्याचा माझा प्रयत्न सुरू आहे, हा आरोप धादांत खोटा, असा प्रतिवाद टाटा सन्सचे हकालपट्टी केलेले अध्यक्ष सायरस मिस्त्री यांनी रविवारी केला. टाटा सन्सकडून स्वतंत्र संचालकावर सुरू असलेली टीका दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

टाटा सन्सच्या नऊ पानी खुल्या पत्रातील मुद्दे खोडून काढणारे निवेदन मिस्त्री यांच्या कार्यालयाने जाहीर केले. यात म्हटले आहे, की चुकीच्या हेतूने आणि हुशारीने स्वतंत्र संचालकांना जबाबदारीपासून दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सार्वजनिकरीत्या टाटा सन्स किती खालच्या पातळीला येऊन बोलू शकते, हे यातून समोर आले आहे. दीपक पारख, नुस्ली वाडिया, नादिर गोदरेज यांच्यासह अनेक कर्तबगार स्वतंत्र संचालकांबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण केले जात आहे. हे अतिशय दुर्दैवी आहे. हे संचालक भारतीय उद्योग विश्‍वातील महनीय व्यक्ती आहेत.

माझ्याकडून कोणत्याही कंपनीवर हक्क मिळविण्याचा प्रयत्न झालेला नाही. संचालक मंडळाची रचना बदलण्याचा निर्णय एकूण निर्णय प्रक्रियेत कंपन्यांना स्वातंत्र्य मिळावे म्हणून घेण्यात आला होता. माझ्या नेतृत्वाखाली कंपन्यांनी समूहाची तत्त्वे आणि नियम पाळावेत, यासाठी प्रयत्न करण्यात आले. याच वेळी कंपन्यांना स्वातंत्र्यासोबत जबाबदारीही देण्यात येणार आहे, असे मिस्त्री यांनी नमूद केले आहे.

टाटा ट्रस्ट, टाटा सन्स आणि समूहातील कंपन्या यांच्यातील संपर्क हा "इनसायडर ट्रेडिंग'शी संबंधित कायदेशीर चौकटीत असण्याची गरज होती. याबाबत संचालकांपैकी नऊ संचालकांच्या वर्तनाबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात आले. यातील सहा जणांची नियुक्ती रतन टाटा यांच्या काळात झाली होती.
- सायरस मिस्त्री