प्रदेश कॉंग्रेस आता 'कात' टाकणार 

रविवार, 9 जुलै 2017

टिळक भवन येथे कॉंग्रेस जिल्हा व प्रदेश कार्यकारिणीची बैठक नुकतीच झाली. या वेळी चव्हाण यांनी अत्यंत आक्रमक होत काम न करणाऱ्या निष्क्रिय पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. राज्यात शेतकरी कर्जमाफी, नोटबंदीसारखे विषय कॉंग्रेसने हाती घेतले.

मुंबई - लोकसभा व विधानसभा निवडणुकीत दारूण पराभवाचा सामना केल्यानंतर आता प्रदेश कॉंग्रेसने "कात' टाकून धाडसी निर्णय घेण्याचे सूतोवाच केले आहेत. प्रदेश जिल्हा व तालुका कार्यकारिणीत आमूलाग्र बदल करण्याचा स्पष्ट इशारा प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिला असून, पन्नास टक्के नव्या चेहऱ्यांना संधी देणार असल्याचे सूतोवाच कालच्या बैठकीत केले. 

टिळक भवन येथे कॉंग्रेस जिल्हा व प्रदेश कार्यकारिणीची बैठक नुकतीच झाली. या वेळी चव्हाण यांनी अत्यंत आक्रमक होत काम न करणाऱ्या निष्क्रिय पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. राज्यात शेतकरी कर्जमाफी, नोटबंदीसारखे विषय कॉंग्रेसने हाती घेतले. प्रदेश प्रवक्‍त्यांनी अभ्यासूपणे सरकारच्या निर्णयाचा भंडाफोड केला; मात्र स्थानिक पातळीवर याबाबत अत्यंत ढिलाई दिसली, असा निष्कर्ष नोंदवत काम करायचे नसेल तर हरकत नाही, आता पन्नास टक्के नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची योग्य संधी आली असून, लवकरच याची अंमलबजावणी केली जाईल, असा दम भरला.

दरम्यान, कॉंग्रेसने नव्याने पक्षबांधणीचा आराखडा तयार केला असून, 2019 च्या निवडणुकांपर्यंत अशोक चव्हाण यांचे प्रदेशाध्यक्षपद कायम राहणार असल्याचे सांगितले जात आहेत. पक्षबांधणी व बदलाचे सर्वाधिकार प्रदेशाध्यक्षांना देण्यात आले असून, आक्रमकपणे पक्षबांधणी करण्याचा मानस चव्हाण यांनी व्यक्त केला. ज्यांना केवळ पदाची ऊब घ्यायची आहे, त्यांना आता पदमुक्त करण्याची वेळ आली असून, कॉंग्रेसच्या विचारांचे नवे चेहरे पक्षात सक्रिय केले जाणार असल्याचे स्पष्ट वक्तव्य बैठकीत केले.