मुंबईत कॉंग्रेसचा शिवसेनेला पाठिंबा?

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

'वेट अँड वॉच'ची भूमिका; नव्या राजकीय समीकरणांची शक्‍यता

'वेट अँड वॉच'ची भूमिका; नव्या राजकीय समीकरणांची शक्‍यता
मुंबई - मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर तयार झालेल्या विचित्र राजकीय परिस्थितीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या कॉंग्रेसची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. "मॅजिक फिगर' गाठण्यासाठी शिवसेनेला कॉंग्रेसने पाठिंबा दिला, तर भाजपशिवाय पालिकेवर "भगवा' फडकविण्याचे सेनेचे स्वप्न सत्यात उतरू शकते. मात्र, कॉंग्रेसने याबाबतीत अद्यापही "वेट अँड वॉच'ची भूमिका घेतली आहे. विशेष म्हणजे शिवसेनेला भविष्यात समर्थन देण्याला कॉंग्रेसच्या नेत्यांनी स्पष्ट नकार दिलेला नाही, त्यामुळे मुंबई पालिकेच्या निमित्ताने नवे राजकीय गणित आकाराला येण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या शिवसेना आणि भाजपच्या संख्याबळात केवळ दोन जागांचा फरक आहे. शिवसेनेला 84, तर भाजपला 82 जागांवर यश मिळाले आहे. शिवसेनेला तीन अपक्षांनी पाठिंबा जाहीर केल्याने त्यांचे संख्याबळ 87 वर पोचले आहे. मात्र, महापौरपदावर दावा करण्यासाठी त्यांना अजून 27 नगरसेवकांची गरज आहे. भाजपची मदत न घेता पालिकेची सत्ता टिकविण्यासाठी शिवसेनेने कॉंग्रेसच्या 31 नगरसेवकांचा पाठिंबा घेतला तर शिवसेनेचा आकडा 118 वर पोचेल. सध्या अपक्ष म्हणून निवडून आलेले उमेदवार आणि इतर पक्षांतून आयात करता येणारे नगरसेवक यांच्यावर शिवसेनेचा "डोळा' आहे. पण, याचबरोबर कॉंग्रेसचा पाठिंबा घेऊन महापौरपद मिळविण्याच्या पर्यायावरही विचार सुरू आहे. अशा परिस्थितीत कॉंग्रेस नेमकी काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवसेनेकडून अजून कोणताही प्रस्ताव आला नसल्याने कॉंग्रेसने सावध पवित्रा घेतला आहे. शिवसेनेला स्पष्ट नकार देण्याचे धाडसही कॉंग्रेसने दाखविलेले नाही. यावरून येत्या काळात या पर्यायावर विचार होऊ शकतो, असे सूतोवाच कॉंग्रेस नेत्यांकडून करण्यात आले आहे.

मुंबई महानगरपालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेना आणि भाजपने निर्णय घ्यायचा आहे. कॉंग्रेसकडे 31 नगरसेवक असून आम्ही तिसऱ्या क्रमांकावर आहोत, त्यामुळे पाठिंब्याविषयी आताच काही बोलणे उचित ठरणार नाही. सध्या कॉंग्रेसची "वेट अँड वॉच'ची भूमिका आहे.
- अशोक चव्हाण, अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस

राजकारणात दुश्‍मनी मानत नाही - राणे
माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेतून कॉंग्रेसमध्ये दाखल झालेले नारायण राणे यांनी मुंबईत नव्या राजकीय समीकरणाविषयी सूचित केले आहे. "शिवसेना माझी दुश्‍मन नाही. राजकारणात दुश्‍मनी मानत नाही', असे वक्तव्य करत राणे यांनी "गुगली' टाकली आहे. त्यांचे हे वक्तव्य खरे ठरले तर येत्या काळात शिवसेनेला कॉंग्रेसचा पाठिंबा मिळण्यास काहीस हरकत उरणार नाही.