भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर विधान परिषद ठप्प

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 1 ऑगस्ट 2016

राज्य सरकारमधील नऊ मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. याबाबत विरोधकांनी सरकारपुढे पुरावेही सादर केले आहेत. विरोधकांच्या आरोपांची आणि दिलेल्या पुराव्यांचीही चौकशी करावी, हे पुरावे खोटे आढळल्यास सरकार देईल ती शिक्षा भोगायला तयार आहे.
- धनंजय मुंडे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते 

‘कमिशन ऑफ इन्क्वायरी ऍक्‍ट‘नुसार चौकशीची मागणी
मुंबई - मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर राज्य सरकारची कोंडी करण्याचा पुरेपूर प्रयत्न विधान परिषदेत विरोधकांकडून होत आहे. परिषदेत बहुमतात असलेल्या विरोधकांनी ही अचूक वेळ साधल्याने सत्ताधारी मंडळींनाही सभागृहाचे कामकाज चालवताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची "कमिशन ऑफ इन्क्वायरी ऍक्‍ट‘नुसार चौकशी करावी, अशी आग्रही मागणी कॉंग्रेस-राष्ट्रवादीसह विरोधकांनी लावून धरली आहे. परिणामी, विधान परिषदेचे कामकाज सलग दुसऱ्या दिवशी आज दिवसभरासाठी तहकूब झाले. दरम्यान, विरोधकांच्या गोंधळातच सरकारने तेरा हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर करून घेतल्या.

राज्यातील फडणवीस सरकारमधील नऊ मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे विविध आरोप आहेत. या प्रकरणात विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी सर्वच मंत्र्यांना क्‍लीन चिट दिली आहे, तर विधान परिषदेतही सोमवारी संबंधित मंत्र्यांनी स्वतःवरील आरोपांचे खंडन केले आहे. मात्र, विधानसभेत सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न फसल्यानंतर परिषदेत बहुमतात असलेल्या विरोधकांनी या मुद्द्यावर सरकारची जमेल तशी कोंडी करण्याचा निश्‍चय केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे दुपारी बारा वाजता सभागृहाचे नियमित कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा उपस्थित केला. विरोधकांनी केलेले आरोप खोटे अथवा चुकीचे असतील, तर द्याल ती शिक्षा कबूल असल्याचेही त्यांनी सांगितले.

भ्रष्टाचाराच्या आरोपांची कमिशन ऑफ इन्क्वायरी ऍक्‍टनुसार चौकशी करावी, अशी आग्रही मागणीही मुंडे यांनी केली, तसेच तोपर्यंत सभागृहाचे कामकाज चालू दिले जाणार नाही, असा इशाराही दिला. कॉंग्रेसचे आमदार माणिकराव ठाकरे, शरद रणपिसे, शेकापचे जयंत पाटील यांनीही मुंडे यांची मागणी उचलून धरली.

भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना राजीनामा द्यावा लागत असेल, तर इतरांनाही तोच नियम लावला पाहिजे, असा आग्रह जयंत पाटील यांनी धरला. याच मुद्द्यावर विरोधकांनी सभागृहात जोरदार गोंधळ घातला. गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज सुरवातीला दोनदा आणि दुपारी एक वाजता दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.