प्रगत महाराष्ट्रासाठी विचारमंथन

Delivering Change Forum Council in mumbai
Delivering Change Forum Council in mumbai

पुणे - समाजाच्या हितासाठी झटणाऱ्या आणि व्यवसायाच्या पलीकडे जाऊन समाजात सकारात्मक बदल घडवू इच्छिणाऱ्या मान्यवरांच्या उपस्थितीत उद्यापासून (ता. २४) दोन दिवस मुंबईत ‘डिलिव्हरिंग चेंज फोरम’ ही विचारमंथन परिषद होत आहे. ‘सकाळ माध्यम समूह’, ‘डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन’ यांनी संयुक्तपणे महाराष्ट्र सरकार आणि जगभरातील मान्यवर संस्थांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या परिषदेचे उद्‌घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.

समाजाच्या विविध क्षेत्रांत आणि घटकांत कार्यरत समाजधुरीणांना सुजाण समाजनिर्मितीत मदत करणारे व्यासपीठ असलेल्या ‘डिलिव्हरिंग चेंज फोरम’ने यासाठी पुढाकार घेतला आहे. विविध देशांतील तज्ज्ञ तसेच वेगवेगळ्या क्षेत्रांत कार्यरत असलेले राज्यभरातील निमंत्रित मान्यवर पुढील काळात महाराष्ट्रात परिवर्तन घडवण्यासाठी काम करणार आहेत.

मुंबईतील नेहरू सेंटरच्या अद्ययावत संकुलात ही परिषद होईल. ‘डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन’चे संस्थापक अध्यक्ष अभिजित पवार परिषदेची संकल्पना स्पष्ट करतील.

प्रशासकीय व व्यवस्थापकीय अनुभव आणि समाजाविषयी असलेली तळमळ, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उपेक्षित, दुर्लक्षित घटकांच्या उत्थानासाठी केलेल्या कार्यातून आलेले कामकाजातील कौशल्य जगाच्या कानाकोपऱ्यांत वापरून अनेकांच्या जीवनात प्रगतीची पहाट आणणारे तज्ज्ञ या परिषदेत आपले अनुभव मांडणार आहेत. जगात अनेक ठिकाणी परिवर्तनाचे यशस्वी प्रयोग केलेले हे तज्ज्ञ आपली कार्यप्रणाली या दोन दिवसांतील विविध सत्रांमध्ये उलगडणार आहेत.

परिषदेसाठी ग्रामीण आणि नगरविकास, पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, शेती, पाणी, सहकार, महिला आणि बाल कल्याण, सामाजिक न्याय, कायदा, उद्योग आणि व्यवसाय, ऊर्जा, अर्थ आणि महसूल अशा अनेकविध क्षेत्रांत कार्यरत असलेली, सातत्याने अभ्यास करणारी राज्यभरातील मान्यवर मंडळी सामील होणार आहेत. अशा तज्ज्ञांशी संवाद साधत हे जगभरातून आलेले तज्ज्ञ अशा उपक्रमांसाठी विकसित केलेल्या व्यवस्थापकीय आणि प्रशासकीय कामकाज प्रणाली आणि त्यांच्या वापरातून कार्यात येणारी अधिकाधिक परिणामकारकता यांची माहिती देणार आहेत.
या परिषदेमध्ये परिवर्तनाच्या मार्गाने जाताना येणारे अडथळे आणि अडचणी, त्यावर मात करण्यासाठी काय करता येईल, यावर विचारमंथन होणार आहे. प्रत्यक्षात कार्य करत असताना येणारी आव्हाने आणि त्याचे स्वरूप समजून घेतले जाईल. समाजात संवाद साधणे, थेट लोकांमध्ये मिसळून कार्य करणे, त्यांच्यासमोरील समस्यांचे स्वरूप समजावून घेणे आणि त्यावर कायमस्वरूपी व्यापक तोडगा काढण्यासाठी तंत्रज्ञान आणि व्यवस्थापनाची सांगड घालत प्रणाली विकसित करणे या दिशेने या वेळी प्रयत्न होतील. या परिषदेनंतरही विविध सत्रांमध्ये मार्गदर्शन करणारी तज्ज्ञ मंडळी आणि या परिषदेत प्रातिनिधिक स्वरूपात सहभागी झालेली मंडळी आगामी काळातही ‘सकाळ’ आणि ‘डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन’ यांनी निवडलेल्या क्षेत्रांमधील परिवर्तनासाठी हातात हात घालून कार्य करणार आहेत. या क्षेत्रांमध्ये सकारात्मक बदल घडवून ग्रामीण आणि शहरी जनतेला आपले जीवनमान उंचावण्यास मदत करण्याचा हा प्रयत्न असणार आहे.

परिषदेत मार्गदर्शन करणारे वक्ते
मलेशियाच्या पंतप्रधान कार्यालयाच्या अखत्यारीतील ‘पेमांडू’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि ‘बीएफआर इन्टिट्यूटट’चे व्यवस्थापकीय संचालक दातोश्री इद्रीस जाला, आयडीसी हर्जलियाचे संस्थापक आणि अध्यक्ष प्रा. उरील राईकमन, आयडीसी हर्जलियाचे रिसर्च अँड ग्लोबल एंगेजमेंटचे संचालक डॉ. एरिक झिमरमॅन, झेडकेएम, कार्ल्स ऱ्हूच्या व्यवस्थापकीय संचालक ख्रिस्तीन रिडेल, तेल अवीव महापालिकेतील चीफ नॉलेज ऑफिसर जोहर शेरॉन, होरॅसिसचे अध्यक्ष फ्रॅंक जुगेन रीचर, पॅलाडियमच्या स्ट्रॅटेजिक ग्रोथ अँड इनोव्हेटिव्ह डेव्हलपमेंट फायनान्सिंग विभागाचे प्रमुख पीटर व्हॅंडरवॉल, व्हायटल कॅपिटलचे संस्थापक भागीदार इटन स्टिब, पॅलाडियमचे ग्लोबल ब्रॅंड डायरेक्‍टर इस्तबान गोमेझ नदाल, कॅटॅपुल्ट आयडियाजचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जोशुआ कॅब कॉलिन्स, पॅलाडियम थॉट लीडरशिपचे संचालक एदुआर्दो तुदनहाट, झेडकेएमचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. पीटर वायबल, बर्लिन कला विद्यापीठातील डिझाइन रिसर्च लॅबच्या प्रमुख प्रा. गेसी यूस्ट, जर्मनीतील बाडेन वुर्टेनबर्ग राज्याच्या विज्ञान, संशोधन आणि कला मंत्री पेत्रा ओशावस्की, स्नॅपचे सहसंस्थापक असाफ किंडलर, मस्केटिअर ॲपचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शाऊल अविदोव, प्रोग्रॅमर आणि थ्री डी शिल्प कलाकार याल गेवर, तत्त्ववेत्ते, लेखक प्रा. पीटर सोतेर्जिक, ॲलन ग्रे ऑर्बिस फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँथनी फार, मेंटॉरक्‍लाऊडचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रवी गुंडलपल्ली, फ्राऊनहॉपर इन्स्टिट्यूट फॉर इंटरफेशियल इंजिनिअरिंग अँड बायो टेक्‍नॉलॉजी (आयजीबी)च्या संचालक प्रा. डॉ. काट्‌जा शाईन्क-लेलॅन्ड, जेथ्रो लि.चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गबी (गव्हरियल) नेहम, पॅलेडियमच्या ईएमईए रिजनचे डायरेक्‍टर (स्टॅटेजी एक्‍झिक्‍युशन) जोस मारिया ओर्तिझ आणि पुणे महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com