फडणवीस, दानवे यांच्या पदांमध्ये कोणताही बदल नाही: भाजप

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 27 ऑगस्ट 2017

मुख्यमंत्री फडणवीस यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश, प्रदेशाध्यक्ष पदावरून रावसाहेब दानवे यांची उचलबांगडी आणि कॉंग्रेसचे नेते नारायण राणे यांचा भाजप प्रवेश याबाबत महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहेत. खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांनीही आपण महाराष्ट्रातच राहणार असून रावसाहेब दानवे हेच प्रदेशाध्यक्षपदी राहतील, असे स्पष्ट करूनही चर्चा थांबलेल्या नाहीत.

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या पदांमध्ये बदल होणार असल्याचा भाजपच्या उच्चस्तरीय वर्तुळातून इन्कार करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात फडणवीसांच्या संभाव्य समावेशाबाबत "तुम्ही तर्कवितर्क करत राहा,' असे भाजप सूत्रांनी स्पष्ट केले. कॉंग्रेसचे नेते नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाबाबतही "असा कोणताही प्रस्ताव राज्यातून आलेला नाही,' असे सांगण्यात आले. 

मुख्यमंत्री फडणवीस यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश, प्रदेशाध्यक्ष पदावरून रावसाहेब दानवे यांची उचलबांगडी आणि कॉंग्रेसचे नेते नारायण राणे यांचा भाजप प्रवेश याबाबत महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहेत. खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांनीही आपण महाराष्ट्रातच राहणार असून रावसाहेब दानवे हेच प्रदेशाध्यक्षपदी राहतील, असे स्पष्ट करूनही चर्चा थांबलेल्या नाहीत. अशात फडणवीस यांनी नारायण राणे यांच्या घरी गणपती दर्शनासाठी लावलेली हजेरी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा उद्याचा (ता. 27) मुंबई दौरा यावरून पुन्हा एकदा तर्कांना उधाण आले आहे. अमित शहा उद्या मुंबईत लालबागचा राजा गणपतीच्या दर्शनासाठी जाणार आहेत. 

भाजप मुख्यालयामधील उच्चस्तरीय सूत्रांनी, फडणवीस यांना केंद्रात आणण्याच्या बातम्या वावड्याच असल्याचा दावा केला. पक्षाध्यक्ष अमित शहा राज्यसभेवर निवडून आल्यानंतर आता केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी होतील, हीदेखील वावडी असल्याचेही या सूत्रांनी स्पष्ट केले. राणे यांना भाजपमध्ये प्रवेश देण्याबाबत प्रदेश शाखेकडून केंद्रीय नेतृत्वाकडे कोणत्याही प्रकारची औपचारिक विचारणा करण्यात आली नसल्याचा दावाही सूत्रांनी केला. अमित शहा यांना नारायण राणे एकदाही भेटलेले नाहीत. राणे यांचे शंकरसिंह वाघेलांसारखे झाल्याची मिस्किल टिप्पणी या सूत्रांनी केली.