शिवसेनेला औकात दाखवू! - देवेंद्र फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 जानेवारी 2017

मुंबई - मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला 60 जागा देऊ करत शिवसेनेने आमची औकात दाखवली; आता त्यांची औकात काय आहे, हे आम्ही 21 तारखेला दाखवून देऊ, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (ता.29) शिवसेनेला प्रत्युत्तर दिले. देशाचा, महाराष्ट्राचा आणि मुंबईचा विकास हा आमचा अजेंडा आहे. आता धर्मयुद्ध सुरू झाले असून त्यात आम्हीच जिंकू. सत्याची बाजू कोणाची आहे, हे निकालानंतरच सर्वांना पाहायला मिळेल, असेही ते म्हणाले.

गोरेगाव येथे मुंबई भाजपतर्फे झालेल्या गटप्रमुखांच्या मेळाव्यास मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री बोलत होते. "आम्ही 25 वर्षें युतीमध्ये सडलो' या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विधानावरही त्यांनी भाष्य केले. शिवसेना युतीत सडली, म्हणण्यापेक्षा भाजपने तुमच्या हाती सत्ता दिली आणि मुंबईचे नुकसान झाले, असे सत्य आहे. तुमचे-आमचे नाते हे हिंदुत्वाचे नाते होते. ते आम्ही जपले, असेही ते म्हणाले.

शिवसेनेशी असलेली युती तुटल्याचा संदर्भ देत मुख्यमंत्री म्हणाले, "आम्ही युतीसाठी आग्रही होतो. जागांबाबत आम्ही कधीही आग्रही नव्हतो. केवळ अजेंडा पारदर्शक हवा, असे आमचे म्हणणे होते. पारदर्शक अजेंड्याची मागणी केली, तर आमचे काय चुकले? शिवसेनेलाच पारदर्शीपणा नको होता. कुणी किती जागा लढवायच्या, या मुद्द्यावर आम्ही शिवसेनेशी फारकत घेतलेली नाही. ती त्यांच्या विचारांपासून घेतली आहे.' लोकसभा-विधानसभा निवडणुकीत आम्ही शिवसेनेच्या पुढे होतो. त्यामुळे अधिक जागा मागितल्या होत्या, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. आमची लढाई आता शिवसेनेशी नाही. ही लढाई शिवसेनेचा आचार आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या विचारांविरोधात आहे, असेही ते म्हणाले.

'आम्ही जुगलबंदी करणारे नाही आहोत'
आम्ही जुगलबंदी करणारे नाही आहोत. आम्ही नोटबंदी करणारे, तसेच भ्रष्टाचाराच्या विरोधात आहोत. मी शिवसेनेला कौरव म्हणणार नाही. कारण, मी सत्तेत त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलो आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी युती तुटली होती. यासाठी मी नियतीचे आभार मानतो. अन्यथा मी मुख्यमंत्री झालो नसतो, असेही ते म्हणाले.

परिवर्तन समय की मांग है!
परिवर्तन समय की मांग है... परिवर्तन होके रहेगा, असा विश्‍वासही मुख्यमंत्र्यांनी या वेळी व्यक्त केला.

मुंबईतील झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास, मध्यमवर्गीयांना परवडणारी घरे, ट्रान्सहार्बर लिंक, कोस्टल रोड, मुंबई मेट्रो-3, बीडीडी चाळींचा पुनर्विकास आदी अनेक मुद्द्यांवर आमचे सरकार वेगाने काम करत आहे. त्याचे चांगले परिणामही दिसत आहेत, असा दावाही मुख्यमंत्र्यांनी या वेळी केला.

'21 तारखेला पाणी पाजेन'
भाषण करता करता मुख्यमंत्र्यांना तहान लागल्याने ते घोटभर पाणी प्यायले. त्यानंतर ते उत्स्फूर्तपणे म्हणाले, "मी आता पाणी पीत आहे; पण 21 तारखेला समोरच्याला पाणी पाजणार आहे.'