अन्नदात्याचा अंत पाहू नका- उद्धव ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 मे 2017

तुरीची आयात कशासाठी?
राज्यात व देशभरात तुरीचे बंपर पीक आलेले असताना आयात का केली? नियोजन कोणी केले? असा सवाल उद्धव यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी तुरीच्या शेवटच्या दाण्यापर्यंत खरेदी करण्याची घोषणा केली आहे. ती त्यांनी पूर्ण केली पाहिजे. मुदत वाढवा, जाचक अटी शिथिल करा; पण शेतकऱ्यांची तूर खरेदी करा, असे उद्धव म्हणाले.

औरंगाबाद : दिल्लीश्‍वरांनी हात वर केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात शेतकऱ्यांना कर्जमुक्‍त करण्याविषयी निवेदन केले. अधिवेशनातील निवेदन म्हणजे दिलेले वचन असते. पेरणी सुरू होण्यास महिनाच राहिला असून, लवकरात लवकर कर्जमुक्‍ती झाली पाहिजे. यासाठी आता अन्नदात्याचा अधिक अंत पाहू नका. कर्जमुक्‍तीसाठी टोकाची लढाई लढून शेतकऱ्यांना न्याय देऊ, अशी ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली.

शिवसेनेतर्फे 'शिवसंपर्क' अभियानाअंतर्गत शनिवारी मराठवाड्यातील 46 विधानसभा मतदारसंघांत प्रत्येकी एक आमदार आणि मुंबई महापालिकेतील एक नगरसेवक अशा दोघांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. सर्व जिल्ह्यांतील सर्व आमदारांनी रविवारी (ता. 7) ठाकरे यांच्याकडे अहवाल सादर केला. त्याचा आढावा घेतल्यानंतर उद्धव यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
उद्धव म्हणाले, की राज्यात संघर्ष यात्रांचे पेव फुटले आहे; पण हे शिवसंपर्क अभियान त्यापैकी एक नाही. या अभियानाची मराठवाड्यातून सुरवात झाली असून, लवकरच राज्याच्या विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आदी भागांमध्येही राबविण्यात येईल.

समृद्धी महामार्गाविषयी उद्धव म्हणाले, की हे स्वप्न फार चांगले आहे. मात्र कोणाचा तरी सत्यानाश करून विकास नको. आम्ही शेतकऱ्यांबरोबर आहोत. सुपीक जमिनी घेऊन वेडीवाकडी विकासाची स्वप्ने दाखवू नका.
अनेक राज्यांमध्ये राज्यपालपदावर संघाची विचारधारा असेलेले लोक बसले आहेत. त्यामुळे शिवसेनेने राष्ट्रपतिपदासाठी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नावाला पाठिंबा दिला तर काय हरकत आहे? असा सवाल करून आपण आजही त्यावर ठाम असल्याचे उद्धव यांनी स्पष्ट केले.

'मी कर्जमुक्‍त होणारच' संकल्पना
उद्धव ठाकरे म्हणाले, की जुने कर्ज फेडल्याशिवाय शेतकऱ्याला नवे कर्ज मिळणार नाही. सरकारला खूप वेळ दिला, आता शिवसेना टोकाची भूमिका घेऊन शेवटची लढाई लढणार आहे. लवकरच शेतकऱ्यांसोबत गावोगावी जाऊन 'मी कर्जमुक्त होणारच' ही संकल्पना राबविणार असून येत्या आठ दिवसांत याची अधिकृत घोषणा होईल. सध्या माझ्यासमोर निवडणूक नव्हे; तर शेतकरी आहे.