'राज्यात बाबासाहेबांची साहित्य अकादमी स्थापणार'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 ऑगस्ट 2016

नागपूर - डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे गाढे अभ्यासक होते. समाजातील विविध समस्यांवर मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी अनेक ग्रंथ लिहिलीत. देशविदेशात बऱ्याच प्रमाणात बाबासाहेबांचे साहित्य आणि ग्रंथसंपदा असल्याने ती ग्रंथसंपदा आणि साहित्य जपणारी अकादमी राज्यात तयार करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले यांनी केली. 

राज्यासह देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करण्यात येत आहे. या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. याच अनुषंगाने राज्यातील विद्यापीठांतर्फे राज्यस्तरीय समाजप्रबोधन विद्यार्थी परिषदेचे आयोजन करण्यात आले. या वेळी कुलगुरूंच्या शुभेच्छा संदेशात विशेष पाहुणे असलेले उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावचे डॉ. सुधीर मेश्राम यांनी मुंबईच्या इंदू मिल येथील जागेवर बाबासाहेबांच्या नावाने साहित्य अकादमी तयार करण्यात यावी, तसेच त्यात बाबासाहेबांचे संपूर्ण साहित्य ठेवण्यात यावे अशी मागणी राजकुमार बडोले यांना केली. त्याला उत्तर देताना, त्यांनी सफाईदार पद्धतीने "इंदू मिल‘च्या जागेचा संदर्भ टाळून राज्यात अशी साहित्य अकादमी तयार करण्याची घोषणा केली.
 
"स्टडी सेंटर‘साठी 42 कोटींचा प्रस्ताव
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी विदर्भातील विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने "यशदा‘च्या धर्तीवर एक अत्याधुनिक "स्टडी सेंटर‘ सुरू करण्यासाठी 42 कोटींचा प्रस्ताव असल्याची माहिती कुलसचिव पुरण मेश्राम यांनी दिली. त्या केंद्राला सामाजिक न्याय विभागाने मदत करण्याचे आवाहन कुलसचिवांनी केले. त्याला प्रतिसाद देत, त्यावर लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही राजकुमार बडोले यांनी दिली.