दारूच्या नशेत केला आई, पत्नी, मुलाचा खून 

सुदर्शन हांडे - सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

बार्शी - कोरफळे (ता. बार्शी) येथे अनुरथ व्यंकट बरडे (वय 38) याने दारूच्या नशेत आई, पत्नी व मुलावर घाला घालत त्यांचा निर्घृण खून केल्याची धक्‍कादायक घटना बुधवारी (ता. 8) पहाटे दोन ते तीनच्या सुमारास घडली. रक्‍ताच्या नात्यानेच असा अमानुष घात केल्याने माणुसकीही हादरून गेली आहे. या घटनेने कोरफळे गावावर शोककळा पसरली आहे. 

बार्शी - कोरफळे (ता. बार्शी) येथे अनुरथ व्यंकट बरडे (वय 38) याने दारूच्या नशेत आई, पत्नी व मुलावर घाला घालत त्यांचा निर्घृण खून केल्याची धक्‍कादायक घटना बुधवारी (ता. 8) पहाटे दोन ते तीनच्या सुमारास घडली. रक्‍ताच्या नात्यानेच असा अमानुष घात केल्याने माणुसकीही हादरून गेली आहे. या घटनेने कोरफळे गावावर शोककळा पसरली आहे. 

बरडे हा माजी नगराध्यक्ष विश्‍वास बारबोले यांच्या गाडीचा चालक आहे. काल रात्री उशिरा घरी गेल्यानंतर त्याने दारूच्या नशेत आई सखूबाई बरडे (वय 65), मुलगा सुदर्शन बरडे (वय 13) यांच्या डोक्‍यात दगड फोडायचा घण घालून खून केला. दुसऱ्या खोलीत झोपलेली पत्नी रेश्‍मा बरडे हिला पेटवले. तसेच, दुसरा मुलगा अविनाश बरडे (वय 9) व मुलगी प्रतीक्षा (वय 11) यांच्यावर धारदार सुरीने वार केले. या वेळी आरोपीने घराला आतून कडी लावली होती. या अनपेक्षित हल्ल्याने हादरून गेलेल्या व गंभीर जखमी झालेल्या प्रतीक्षाने आतून लावलेली कडी उघडत घराबाहेर झोपलेले आजोबा व्यंकट बरडे यांना उठवले. 

ही घटना समजताच गावचे पोलिस पाटील संताजी माने हे तीनच्या सुमारास घटनास्थळी आले. जखमी रेश्‍मा, अविनाश व प्रतीक्षा यांना बार्शी येथे रुग्णालयात दाखल केले. गंभीररीत्या भाजलेल्या रेश्‍माचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या तिहेरी हत्याकांडाची माहिती गावात पसरताच संपूर्ण गावच हादरून गेले होते. सकाळी वैराग पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले. 

घराबाहेर बसून राहिला आरोपी 
पहाटे दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास आई, मुलगा, पत्नी यांचा खून करून, तसेच दोन मुलांवर वार केलेला आरोपी अनुरथ बरडे हा भाजल्याने जखमी झाला होता. तो शाल पांघरून घराबाहेरील कट्ट्यावर सुमारे साडेतीन तास बसून होता. सकाळी वैराग पोलिस घटनास्थळी आल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. 

कोणताही निरोगी मनाचा माणूस व्यसनी असूच शकत नाही. व्यसनी व्यक्‍ती म्हणजेच मनोरुग्ण. मनाला तडा गेलेल्या माणसाचे हे लक्षण आहे. अशा घटना समाजाला धक्‍का देणाऱ्या आहेत. ही घटना नेमकी कोणत्या कारणाने घडली हे पाहावे लागेल; पण बदलत्या काळात मानसिक आरोग्य जपले पाहिजे. 
- कृष्णा मस्तुद, मानसोपचार तज्ज्ञ, बार्शी

Web Title: The drunken mother, wife, child murder