प्रेरणेचा झरा 

रवींद्र खैरे - r.s.khaire@gmail.com 
मंगळवार, 7 मार्च 2017


स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या मुलांना प्रेरणेचे नेमके कौशल्य कोण शिकवत असेल? अपयशाचे वैराण वाळवंट तुडवतानाही ही मुले खचत कशी नाहीत? परिस्थितीचे चटके बसत असतानाही शांत आणि गंभीरपणे तासन्‌ तास अभ्यास करण्याचे बळ या मुलांकडे कोठून येत असावे? निकालाचे फासे उलटे पडले तरी ही मुले रडत नाहीत, मोडत नाहीत, यश मिळेपर्यंत लढत राहतात. हा प्रेरणेचा झरा, हे उत्साहाचे उमाळे नेमके कसे निर्माण होत असावेत? 

अधिकारी व्हावे, प्रतिष्ठा मिळवावी या ध्येयाने प्रेरित होऊन हजारो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेसारख्या आव्हानात्मक क्षेत्रात येतात. अभ्यास सुरू करतात, क्‍लासेस, स्पर्धा परीक्षा केंद्रे, वाचनालये, ग्रंथालयाचे उंबरठे झिजवले जातात; पण जसजसे दिवस जातील तसा उत्साह मावळायला लागतो. तासन्‌ तास अभ्यास करण्याचा कंटाळा येतो. नव्याचा नवा उत्साह नऊ दिवसांत निघून गेला, एक दोन परीक्षेत अपयश आले की काही विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा नादच सोडून देत आपला धोपट मार्गही निवडतात. 
काहीजण मात्र याला अपवाद असतात. केवळ काही गुणांमुळे यशाने हुलकावणी दिली तरी ते फार निराश होत नाहीत. टपरीवरचा एक कटिंग चहा पिऊन मित्राच्या पाठीवर थाप मारत "चल दिल पे मत ले यार' असे म्हणत पुन्हा नव्या जोमाने अभ्यासाच्या तयारीला लागतात. अपयश ही यशाची पहिली, दुसरी आणि तिसरी पायरी ठरली तरीही ही मुले खचत नाहीत. घरची बेताची परिस्थिती ही त्याची दुर्दम्य इच्छाशक्ती थोपवू शकत नाही. आलेल्या अपयशानंतर स्वतःचे काळजीपूर्वक विश्‍लेषण करतात, अपयशाचे कारण शोधून काढतात आणि एक दिवस जगाला हेवा वाटावा असे यश मिळवतात. अनेकांना त्यांच्या यशाचे अप्रुप असते; पण मनात अखंड खळाळणारा प्रेरणेचा हा झरा त्यांनी कसा शोधला असावा, याबाबत मात्र बरेच जण अनभिज्ञ असतात. 

यशस्वी मुलांची स्वतःच्या ध्येयावर अढळ निष्ठा असते. हे ध्येयच त्यांना प्रेरणा देते, त्यामुळे ध्येयावर निष्ठा असू द्या. अभ्यासाचा उत्साह अखंडित राहावा यासाठी प्रेरणादायी पुस्तके आणि भाषणांतून प्रेरणेचा थेंब अन्‌ थेंब ती मुले गोळा करतात. काहींची गरिबी आणि हलाखीची परिस्थितीच त्यांची प्रेरणा होते. स्वतःला सिद्ध करण्याच्या इराद्याने ते झपाटून जातात. काही जणांना लाल दिव्याची गाडी, मिळणारे अधिकार, प्रतिष्ठा खुणावत असते. त्या स्वप्नासाठी मुले नानाविध कष्टही झेलतात. काही जणांना स्वतःच्या शारीरिक आणि बौद्धिक व्यंगावर मात करायची असते. त्यासाठी जिवाचे रान करणारेही आपण पाहतो. काहींना साद घालत असतो आतला आवाज, तर काही जण समाजसेवेच्या विचाराने भारलेले असतात. 

काही जण स्वतःचा व स्वतःच्या सवयींचा बारीक अभ्यास करतात आणि कायम हसत, उत्साही राहण्याची सवय लावून घेतात. नंतर ही सवयच त्यांना कायमस्वरूपी प्रेरणा देत राहते. अशा यशस्वी होणाऱ्या प्रत्येकाचे प्रेरणास्थान वेगळे असले, तरी त्यांची स्वप्नेच त्यांना अभ्यासाचे बळ देत असतात. या क्षेत्रात नव्याने येणाऱ्या तरुणांनी स्वतःच्या अखंड प्रेरणेचा मूळ स्रोत शोधायलाच हवा. काळजाच्या एका कप्प्यात तो साठवून ठेवायला हवा. कारण जेव्हा निराशेचा भयंकर राक्षस आपल्या स्वप्नाच्या बालेकिल्ल्याला धडका मरायला लागतो तेव्हा काळजाच्या कप्प्यात साठवून ठेवलेला हा प्रेरणेचा दारूगोळाच कामाला येतो.