कर्जमाफीवरून डाव-प्रतिडाव 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 16 मार्च 2017

मुंबई - विधिमंडळ अधिवेशनाचा पहिला आठवडा शेतकरी कर्जमाफीने आज वादळी ठरला. सर्वपक्षीय आमदारांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा मुद्दा धसास लावल्याने विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले. विधान परिषदेत, विरोधकांनी राज्यपालांच्या अभिभाषणाच्या वैधानिकतेवर आक्षेप घेत सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आव्हान दिले. तसेच कर्जमाफीचा प्रस्ताव मतास टाकण्याची मागणी करून भाजपला एकटे पाडण्याची खेळी खेळत कामकाज दिवसभरासाठी बंद पाडले. 

मुंबई - विधिमंडळ अधिवेशनाचा पहिला आठवडा शेतकरी कर्जमाफीने आज वादळी ठरला. सर्वपक्षीय आमदारांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा मुद्दा धसास लावल्याने विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले. विधान परिषदेत, विरोधकांनी राज्यपालांच्या अभिभाषणाच्या वैधानिकतेवर आक्षेप घेत सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आव्हान दिले. तसेच कर्जमाफीचा प्रस्ताव मतास टाकण्याची मागणी करून भाजपला एकटे पाडण्याची खेळी खेळत कामकाज दिवसभरासाठी बंद पाडले. 

विधानसभेत कर्जमाफीच्या मुद्द्यावर आमदार आक्रमक पद्धतीने अडून बसल्याने या गोंधळात पुरवण्या मागण्या मंजूर केल्या गेल्या. गोंधळामुळे सुरवातीला तीनदा स्थगिती दिल्यानंतर शेवटी संपूर्ण दिवसासाठी कामकाज तहकूब करावे लागले. 

कर्जमाफीवर सर्वपक्षीय सदस्य आक्रमक 
विधानसभेची बैठक सुरू झाल्यानंतर अध्यक्षांनी प्रश्‍नोत्तराची घोषणा केली. यानंतर विरोधक आणि शिवसेना, तसेच भाजपच्या सदस्यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून घोषणाबाजी सुरू करत वेलमध्ये उतरायला सुरवात केली. सदस्य वेलमध्ये उतरण्याच्या अगोदरच अध्यक्षांनी कामकाज अर्ध्या तासासाठी स्थगित केले. यानंतर 11.05 वाजता कामकाज सुरू झाल्यानंतर अवघ्या एका मिनिटात पुन्हा अर्ध्या तासासाठी कामकाज तहकूब केले. बारा वाजता मुख्यमंत्री आल्यानंतर शोक प्रस्ताव मांडला गेला. महाडचे माजी आमदार चंद्रकांत देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर लगेच सदस्यांनी पुन्हा गोंधळ सुरू केला. या गोंधळात पुरवणी मागण्या, तसेच काही विधेयके मंजूर करण्यात आली. गोंधळ वाढत चालल्याने सभागृह पुन्हा 15 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. यानंतर पुन्हा कामकाज सुरू झाल्यावर काही विधेयके विचारात घेतली गेली. यातच शालेय शिक्षणमंत्री तावडे यांनी एक निवेदन मांडले. शेतकरी कर्जमाफीच्या मागणीचा जोर वाढत चालल्याने आणि सदस्य अधिक आक्रमक झाल्याने शेवटी 12.38 वाजता सभागृह संपूर्ण दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. 

सभागृहाबाहेर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी कामकाज सुरू होण्याच्या आधी अर्धा तास पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली. या वेळी निषेधाचे फलक घेऊन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते अजित पवार, जयंत पाटील यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते. शिवसेनेच्या सदस्यांनी मात्र आज सभागृहाबाहेर निदर्शने टाळत सभागृहातच आवाज वाढवलेला दिसला. 

विधान परिषदेत सरकारला आव्हान 
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी सभागृहात एक आणि बाहेर वेगळी अशी विसंगत भूमिका सरकार मांडत असल्याचा आरोप केला. सरकारची केंद्रात एवढी पत वाढली आहे, तर कर्जमाफी करावी, असा टोला त्यांनी हाणला. एक रुपयाची तरतूद नसताना सरकार नवीन प्रकल्प जाहीर करते, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मात्र नियोजन हवे असते, असे सांगत त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रस्ताव मतदानाला टाकण्याचे आव्हानही दिले. धनंजय मुंडे यांनी पहिल्या वर्षी 15 हजार कोटींची कर्जे माफी करावी लागणार होती, ती आता 30 हजार कोटींच्या घरात गेलेली आहेत. त्यामुळे आता कर्जमाफी जाहीर झाल्याशिवाय सभागृह चालू देणार नसल्याचा इशारा दिल्याने सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. या गोंधळात सभागृहनेते चंद्रकांत पाटील यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी, अशी मागणी भाजपबरोबर शिवसेनेचीही आहे; मात्र इतका मोठा निर्णय 

असा तडकाफडकी घेता येणार नाही. मुख्यमंत्र्यांनी सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांबरोबर चर्चा करून ही कोंडी फोडण्याची तयारी दाखवली; मात्र विरोधकांनी त्याला विरोध केला. 

विधान परिषदेत आज राज्यपालांच्या अभिभाषणाच्या आभार प्रस्तावावरच्या चर्चेवेळी विरोधक आक्रमक झाले. भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी राज्यपालांच्या अभिभाषणाचा आभार प्रस्ताव मांडला; मात्र मुंडे यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर आक्षेप घेत सरकारला बहुमत आहे की नाही हे स्पष्ट नाही. त्यामुळे राज्यपालांचे भाषण घटनाबाह्य आहे, असा दावा केला. तसेच अडीच वर्षांपूर्वी सत्तांतर झाले तेव्हा सरकारने गोंधळात विश्‍वासदर्शक ठराव मंजूर केल्याचा दावा त्यांनी केला. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे म्हणाले, की कर्जमाफीच्या मुद्द्यावर सत्तेत असलेली शिवसेना आक्रमक आहे. त्यामुळे सरकार अल्पमतात असून, सरकारने बहुमत सिद्ध करावे. त्यातच शिवसेनेचे आमदार रवींद्र फाटक यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला शिवसेनेचा पाठिंबा असल्याचे सभागृहात जाहीर केले. त्यामुळे विरोधक अजूनच आक्रमक झाले. विरोधकांनी सभापतींच्या आसनासमोरील वेलमध्ये उतरून घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी कामकाज पहिल्यांदा अर्धा तास आणि नंतर 12 वाजेपर्यंत तहकूब केले; मात्र त्यानंतरही विरोधकांनी हेका कायम ठेवला. त्यामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. या गोंधळातच सरकारने राज्यपालांच्या अभिभाषणाचा प्रस्ताव मंजूर करून घेतला. 

चंद्रकांतदादांचे अभिनंदन 
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून विधान परिषदेचे कामकाज सलग सात दिवस बंद पाडणाऱ्या विरोधकांनी आज मात्र सभागृहनेते चंद्रकांत पाटील यांचे अभिनंदन करण्याची संधी सोडली नाही. तटकरे यांनी कर्जमाफीवर विरोधकांची भूमिका मांडण्यापूर्वी "मुख्यमंत्रिपदाची शपथ चंद्रकांतदादा आज किंवा उद्या घेतीलच. त्यापूर्वी त्यांनी कर्जमाफी जाहीर करून टाकावी', असे बोलताच समोरच्या बाकावरील चंद्रकांत पाटील यांनाही हसू आवरले नाही. 

Web Title: Farmer loan issue