अन्यथा शेतकऱ्यांचे शाप लागतील - धनंजय मुंडे 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

मुंबई - युती सरकारच्या काळात शेतकरी इच्छा मरणाची परवानगी मागत आहेत. कर्जबाजारीपणामुळे शेतकरी स्वतःच्या पोटच्या गोळ्यांना सरकारला विकायला तयार झाले आहेत, हेच का अच्छे दिन, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज केली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी भाजप स्थापना दिवसासारखा दुसरा चांगला मुहूर्त नाही, असे सांगतानाच कर्जमाफी देणार नसाल, तर राज्यातील शेतकऱ्यांचे शाप लागल्याशिवाय राहणार नाहीत, अशी टीकाही मुंडे यांनी केली. विधान परिषदेत शेतकरी कर्जमाफीवर अंतिम आठवडा प्रस्तावावर ते बोलत होते. 

वीस हजार व्यापाऱ्यांसाठी सरकार एलबीटीपोटी पाच वर्षांत 35 ते 40 हजार कोटी देणार आहे. मग 1 कोटी 37 लाख शेतकऱ्यांसाठी तीस हजार कोटी दिले, तर बिघडले कुठे का? असा सवाल करत पैसे नाहीत म्हणून कर्जमाफी देत नसाल, तर 700 किलोमीटरच्या समृद्धी महामार्गासाठी 42 हजार कोटी कुठून आणणार, अशी विचारणाही त्यांनी या वेळी केली. मुंडे म्हणाले, "शेतकऱ्यांची व्यथा सरकारला माहिती असूनही शेतकऱ्याला मदत करायची नाही, हे सरकारने ठरवले आहे. शेतकऱ्यांना अर्थसंकल्पाकडून मोठ्या आशा होत्या; मात्र सरकारने शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग केला. लोकसभेच्या निवडणुकीत भाजपने शेतकऱ्याला उत्पादन खर्चावर पन्नास टक्के नफा ठेवून शेतमालाचे हमीभाव देऊ, अशी घोषणा केली होती. शेतकऱ्यांची एका वाक्‍याने फसवणूक केली. अच्छे दिन तर सोडाच सर्वांत वाईट दिवस सध्या शेतकऱ्यांवर आले आहेत. विधानसभेवेळी शेतकऱ्यांना सातबारा कोरा करू, असे स्वप्न दाखवले होते. सत्तेत आले दोन वर्षे दुष्काळ घेऊन आले. तिसऱ्या वर्षी पाऊस पडला; मात्र नोटबंदीने शेतकऱ्यांना उद्‌ध्वस्त केले. शेतकरी अडचणीत आला तर कर्जमाफी दिली पाहिजे, असे स्वामिनाथन आयोगाने सांगितले आहे. या आयोगाची एक शिफारस तर तुम्ही स्वीकारा, अशी विनंतीही मुंडे यांनी सरकारला केली. 

धनंजय मुंडे यांचा घणाघात 
वाहून गेलेल्या शेळ्यांचे पोस्टमार्टम आणायचे कोठून 
राज्यात कोणत्याच पिकाला दर मिळत नाही 
अधिवेशनादरम्यान 106 शेतकऱ्यांच्या आत्महत्या