शेतकऱ्यांची कर्जमुक्ती हा आमचा पहिला विषय - एकनाथ शिंदे

ब्रह्मदेव चट्टे
शुक्रवार, 31 मार्च 2017

शेतकऱ्यांची कर्जमुक्ती हा आमचा प्रथम क्रमांकाचा विषय असून आम्ही आजही कर्जमुक्तीसाठी आग्रही आहे. जोपर्यंत कर्जमुक्ती होत नाही, तोपर्यंत शिवसेनेचा लढा सुरु राहील. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात अर्थसंकल्पात आणि फ्लोअरवर आश्वासन दिलं आहे, असे शिवसेने नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मुंबई - शेतकऱ्यांची कर्जमुक्ती हा आमचा प्रथम क्रमांकाचा विषय असून आम्ही आजही कर्जमुक्तीसाठी आग्रही आहे. जोपर्यंत कर्जमुक्ती होत नाही, तोपर्यंत शिवसेनेचा लढा सुरु राहील. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात अर्थसंकल्पात आणि फ्लोअरवर आश्वासन दिलं आहे, असे शिवसेने नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. शिवसेना मंत्री आणि आमदारांनी आज (शुक्रवार) पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली त्यानंतर एकनाश शिंदे बोलत होते.

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, "शिवसेना आमदारांच्या विकासनिधीसंदर्भात समतोल साधला जाईल. ज्या मतदारांनी निवडून दिले आहे. त्यांची विकासकामे करणे ही माफक अपेक्षा आहे. मुख्यमंत्र्यांनी समाधानकारक उत्तरे दिली आहेत.' यापुढे शिवसेनेच्या कुठल्याच आमदाराची नाराजी राहाणार नाही, असा प्रयत्न मी करेन, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

यावेळी शिवसेना आमदारांना विकासकामांसाठी मिळणारा निधी आणि शेतकरी कर्जमाफी हे मुद्दे शिवसेनेने मुख्यमंत्र्यांसमोर मांडले. याबाबत मंत्री रामदास कदम यांनी सांगितले की, "मुख्यमंत्र्यांनी ठोस आश्वासन दिले आहे. निधी वाटपाबद्दल कोणावरही अन्याय करणार नाही. हे सरकार शिवसेना आणि भाजपचे सरकार आहे. यापूर्वी भाजपच्या आमदारांना जास्त निधी आणि शिवसेनेच्या आमदारांना कमी निधी दिला जात होता. आता यापुढे शिवसेना-भाजपच्या आमदारांना समान निधी वाटप केले जाईल. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनावर पूर्ण विश्वास आहे. अर्थसंकल्पात जी नाराजी होती ती आता दूर झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी शेतकरी कर्जमुक्तीच्या मागणीवर सभागृहात आश्वासन दिलेलं आहे', असे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, गुरुवारी सायंकाळी सात वाजता "मातोश्री'वर शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीला मंत्री दिपक केसरकर, रामदास कदम, दिवाकर रावते, दिपक सावंत, विजय शिवतारे, संजय राठोड, अर्जुन खोतकर, दादा भुसे आदी उपस्थित होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांना भेटून सेना भाजपच्या वाढत असलेल्या तणावावर चर्चा करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार आज शिवसेना मंत्री व आमदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

Web Title: Farmers debt relief is our first priority : Eknath Shinde