गस्ती वाहनांवर आता महिला चालक 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 मे 2017

वाहन चालवण्याचे स्वप्न मी पाहिले होते. लहानपणापासून आवड होती. वाहन चालवताना थोडी भीती वाटली होती. आता मी शिकले आहे. लकवरच आम्ही दामिनी पथकाच्या वाहनावर चालक म्हणून काम करणार आहोत. 
- एस. जे. वाघमारे, चालक महिला 

मुंबई - महिलांच्या सुरक्षेकरता मुंबई पोलिसांच्या ताफ्यात गस्तीसाठी वाहने आहेत. या वाहनांवर आता महिला चालकाचे काम करणार आहेत. नागपाडा मोटर परिवहन विभाग सध्या चार महिलांना वाहन चालवण्याचे प्रशिक्षण देत आहे. या महिलांनी दोन महिन्यांच्या प्रशिक्षणाचा टप्पा पार केला आहे. लवकरच या महिला गस्ती वाहनांवर चालक म्हणून दिसतील. 

महिलांना तत्काळ मदत मिळावी, या हेतूने मुंबई पोलिसांनी गस्त वाहने सुरू केली होती. दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईतील 92 पोलिस ठाण्यांकरता ही वाहने दिलेली होती. या वाहनांत जीपीएस यंत्रणा बसवण्यात आली आहे. महिला पोलिस शिपाईही तैनात आहेत; पण चालक महिलांची संख्या फारच कमी असल्याने पुरुषांनाच वाहने चालवावी लागतात. चालक महिलांसाठी काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी नागपाडा पोलिस परिवहन विभागाचे अतिरिक्त आयुक्त अतुल पाटील यांच्याशी चर्चा केली. 

नागपाडा परिवहन विभागाने यापूर्वी महिला बीट मार्शलला मोटारसायकल चालवण्याचे प्रशिक्षण दिले होते. त्याला प्रतिसादही चांगला मिळाला होता. त्याच धर्तीवर महिलांना वाहन चालवण्याचे प्रशिक्षण देण्यास सुरवात झाली आहे. महिला चालक पदाकरता अंतर्गत सूचना काढण्यात आली आहे. त्यानुसार सशस्त्र विभागातील (एलए) चार महिलांनी अर्ज केला. परिवहन विभागातील प्रशिक्षक हनुमंत वाटे महिलांना वाहन चालवण्यास शिकवत आहेत. हे प्रशिक्षण तीन महिन्यांचे आहे.