गुटखामंत्र्याची गुंडगिरी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 ऑगस्ट 2016

साम टीव्हीचे पत्रकार मिलिंद तांबे यांच्यासोबत गैरवर्तन करून त्यांना धमकावणारे रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांच्यावर कारवाई करावी.

- धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

मुंबई - गुटखामंत्री म्हणून प्रसिद्धी पावलेल्या प्रकाश मेहता यांनी गृहनिर्माण मंत्रालयातल्या काळ्या कृत्यांनी अंधार पाडलाच होता; पण आज त्यांनी आपल्या गुटखाभरल्या तोंडातून पत्रकारांवर उद्दामपणाची राळ उडवत आपल्या ‘संस्कृती’चे दर्शन घडवले. साम वाहिनीच्या पत्रकाराने विचारलेल्या प्रश्‍नांना उत्तर देणे तर त्यांनी नाकारलेच; पण आपल्या कार्यकर्त्यांना या पत्रकाराला धक्काबुक्की करण्याची अप्रत्यक्ष चिथावणीही दिली. मुद्दा होता तो महाड दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाइकांना झालेल्या गैरसोईचा; पण त्या दुःखात होरपळणाऱ्या जिवांचे आपल्याला काहीच सोयरसूतक नसल्याचे या उर्मट पालकमंत्र्यांनी दाखवून दिले. 

‘टीआरपी वाढवण्यासाठी बांबुर्डे घेऊन उभे राहता तुम्ही, तुम्हाला काय कळते काय, आम्ही चाळीस वर्षे या क्षेत्रात आहोत’ असा माज दाखवत ते आपले गुटखाभरले तोंड घेऊन तेथून निघाले. त्यांच्या या वर्तनामुळे योग्य तो ‘संदेश’ मिळालेल्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी कॅमेऱ्यासमोरच या पत्रकाराला धक्काबुक्की करायला सुरवात केली. 

प्रकाश मेहता यांच्या अरेरावी वागणुकीचा हा साम वाहिनीवरील ‘लाइव्ह’ वृत्तात..

साम प्रतिनिधी मिलिंद तांबे - आपल्यासोबत रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश मेहता ते नुकतेच या महाडच्या दुर्घटनास्थळी आलेले आहेत. त्यांनी आता भेट दिलेली आहे. सर मला सांगा लोकांना आपण भेटलेले आहात, आपण बघता लोकांचा आता प्रचंड रोष आहे. कुठल्याही प्रकारची मदत, कुठल्याही प्रकारची माहिती मिळत नाही.

प्रकाश मेहता - हे बघा लोकांचा रोष जो आहे तो खरा आहे. ३६ तास होत आले अजून मृतदेह मिळत नाहीत. ३६-३६ तास नातेवाईक बिचारे इथे आलेले आहेत. त्यांची पहिली प्राथमिकता आहे, की आप्तांचे मृतदेह मिळावेत. त्यांना त्यांच्या माणसांची माहिती हवी आहे. आता आठ अधिकारी इथं बसवलेत अजून शोधकार्यासाठी १५० लोक लागलेत अधिक लोकं लावतोय, केंद्रीय गृहमंत्रालयाशी संपर्क साधत आहोत. जेवढ्या लवकर कारवाई करता येईल ती करण्याचा प्रयत्न करू. सर्वांची काळजी घेणं हे शासनाची जबाबदारी आहे. 

तांबे - सर शोध कार्य सुरू आहे हे बरोबर आहे. मात्र, जे लोकं बेपत्ता आहेत त्यांचे नातेवाईक इथे मोठ्या प्रमाणावर येतात त्यांच्या राहण्याची व्यवस्था असेल, त्यांना छायाचित्र द्यायचे असेल, त्यांना काहीतरी सांगायचे असेल, तर त्याची व्यवस्था नाही, राहण्याची व जेवणाखाण्याची व्यवस्था नाही.

मेहता - हे तुमच्या टीव्हीवाल्यांचं म्हणणं असेल, तर तुम्हाला काय चालवायचं ते चालवा (एकदम उसळून) हा मी जबाबदारीनं बोलतो. 

तांबे - हे लोकांचं म्हणणं आहे आमचं म्हणणं नाही. लोकांनी तुमच्यावरील रोष व्यक्त केलेला आहे. 

मेहता - तुमचं म्हणणं आम्ही ऐकलं आहे आता तुम्ही ऐका ना आमचं. (ओरडून) उगीच कायतरी बोलायचं आणि दुनियेला दाखवायचं सगळं. सगळी व्यवस्था शासनाची आहे. काल संध्याकाळपर्यंत जे चार पाच नातेवाईक आले होते ते इथे आहेत, त्यांना विचारा काय व्यवस्था झाली की नाही झाली (सूर तोच). काल रात्री उशिरापासून जवळजवळ पस्तीसएक नातेवाईक येथे आले आहेत. येथील बंगल्यात व्यवस्था केली आहे. 

तांबे - पण ही खासगी व्यवस्था आहे. सरकारतर्फे काही व्यवस्था दिसत नाही.

मेहता - अरे यार तुम्ही... तुम्हा... तुम्हाला मला बाइट द्यायचा नाही ...  फालतू कायतरी विचारायचं असं काय चालतं का काही.

तांबे - लोकांमध्ये पालकमंत्री म्हणून तुमच्यावर फार रोष आहे, तुम्ही येत नाहीत, व्यवस्था बघत नाहीत, असं लोकांचं म्हणणं आहे. 

मेहता - तुम्ही फार मोठं मेडल घेतलं आहे. अरे तुम्ही जाऊ दे रे माझी पार्टी बघेल. माझी पार्टी बघेल. माझी पार्टी बघेल काय करायचं ते. आता जी घटना घडली त्या लोकांबद्दल आमची सहानुभूती आहे. तुम्हाला तुमचा टीआरपी वाढविण्यासाठी तुम्ही बांबुर्डे घेऊन उभे राहता तुम्हाला काय कळते. तुम्ही काय काम केलंत? आम्ही ४० वर्षे या क्षेत्रात काम करतोय. नुसतं बांबुर्डे घेऊन तुम्ही येऊन उभे राहताय.

तांबे - आपण पाहिलंय की लोकांची इथं व्यवस्था आहे ती होत नाही आहे. नातेवाइकांना माहिती मिळत नाही. मात्र, हे प्रश्न विचारल्याच्यानंतर पालकमंत्री प्रकाश मेहता आपल्यावर रागावले आहेत आणि हे सर्व मीडियाचं कारस्थान आहे, आम्ही सगळी व्यवस्था केली आहे... (मागून प्रकाश मेहता आणि कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की सुरू, बुमचा ताबा घेतला.)

अशा उजळल्या प्रकाशवाटा...

राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी गृहनिर्माण मंत्री म्हणून अनेक वादग्रस्त निर्णय घेऊन आपली कारकीर्द गाजविली आहे. लोकप्रिय बांधकाम व्यावसायिक असलेल्या मेहतांचे अनेक बिल्डरधार्जिणे निर्णय हे सर्वसामान्य लोकांना वेठीस धरणारे होते. मुळातच सामान्य लोकांच्या हिताची कोणतीही चिंता नसलेल्या गुटखामंत्री मेहतांचे हे काही वादग्रस्त निर्णय -

- मुंबईतील म्हाडाच्या १५० हेक्‍टर अतिक्रमित जमिनीवर परवडणारी घरे बांधण्याच्या गृहस्वप्नाला सुरुंग लावून झोपडपट्टी पुनर्विकासाच्या म्हाडाच्या योजनेला केराची टोपली दाखविली. मुंबईतील २३ जागांवर झोपडपट्टीधारकांसाठी मोफत घरे बांधण्याचा निर्णय रद्दबातल करण्याचा घाट मेहतांनी घातला होता.

- मुंबईत म्हाडाने आखलेली झोपडपट्टी पुनर्वसन योजना रद्द करून या जमिनी खासगी विकसकांच्या घशात घातल्यानंतर आता म्हाडाच्या माध्यमातून परवडणाऱ्या घरांसाठी खासगी जमीन खरेदी करण्याचा अजब प्रस्ताव गृहनिर्माण धोरणाच्या माध्यमातून मेहता यांनी मांडला होता.

- नवीन गृहनिर्माण धोरणाच्या माध्यमातून महाराष्ट्र भाडे नियंत्रण अधिनियम १९९९ मध्ये बदल करण्याचा निर्णय सरकारने घेतला. यानुसार भाडेकरूंना बाजारमूल्याएवढेच भाडे भरावे लागणार असल्याने मुंबईत भाड्याने घर घेणेही मेहता यांनी कठीण करून ठेवले.

- नवीन गृहनिर्माण धोरणाच्या आडून बांधकाम व्यावसायिकांना म्हाडाची जागा आणि अतिरिक्त चटई क्षेत्रासोबतच हाउसिंग स्टॉकच्या बांधकामासाठीदेखील रेडी रेकनरच्या दराने मोबदला देण्याचा अजब प्रस्ताव मेहतांच्या गृहनिर्माण विभागाने मांडला होता. 

- सरकारी जमिनींवरील गृहनिर्माण प्रकल्पांकरिता निधी उभारण्यामध्ये खासगी विकसकांना अडचणी येत असल्याने त्यांना सरकारी जमिनी गहाण ठेवण्याचा अधिकार बहाल करण्याचा निर्णयही मेहतांच्या गृहनिर्माण विभागाने घेतला. विकसकांना मुंबईच बॅंकांकडे गहाण ठेवण्याची मुभा देऊन सामान्यांच्या परवडणाऱ्या घरांचे स्वप्न धुळीस मिळविण्याचा निर्णय घेतला होता.

पालकमंत्री प्रकाश मेहता आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची वागणूक योग्य आहे का, पाहा हा व्हिडिओ आणि तुम्हीच ठरवा..

व्हिडीओ गॅलरी