लग्नासाठी लाखभर देऊनही पुण्याची नवरी गेली पळून

लग्नासाठी लाखभर देऊनही पुण्याची नवरी गेली पळून

जळगाव - बहुतांश समाजांत लग्नासाठी मुली मिळेनाशी अवस्था निर्माण झाल्याने पैसे देऊन मिळेल त्या मुलीशी लग्न करण्याची वेळ मुलाच्या पालकांवर येऊन ठेपली आहे. मेहरुण शिवारातील हनुमाननगर भागात अशाच एका कुटुंबात एक लाख रुपये पुणे येथील मुलीच्या आई-वडिलांना देण्याचे कबूल करून लग्न ठरविण्यात आले होते. मात्र, हळद लागण्यापूर्वीच आज पुण्याची ही नवरी मुलगी लग्नघरातून पसार झाली.

मुलीच्या आई- वडिलांना साखरपुड्याच्या वेळेस पन्नास हजार रुपये देण्यात आले होते. लग्नघटिकेपूर्वी आज वधूने उर्वरित पैसे मिळाले नाहीत म्हणून हळद लागण्यापूर्वीच धूम ठोकली. त्यानंतर मुलीच्या आई-वडिलांना परिसरातील महिलांनी चोप देत थेट औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्यात आणले. मुलाच्या नातेवाइकांनी पसार मुलीच्या आई-वडिलांविरोधात तक्रारी अर्ज दिला.

शहरातील मेहरुण भागातील रहिवासी भागवत वना पाटील (वय २५) यांचे पुण्यातील श्री. निकम यांच्या मुलीशी ठरला होता. मागील महिन्यात २० नोव्हेंबरला मुलीच्या पालकांना पन्नास हजार रुपये रोख देऊन साखरपुडा करण्यात आला; तर आज (ता. १२) सायंकाळी हळद आणि उद्या (ता. १३) विवाह सोहळा नियोजित होता. 

पुणे येथील रहिवासी व जळगावातील सासर असलेल्या रेखा रावजी चव्हाण यांनी भागवतच्या विवाहासाठी या पुण्याच्या मुलीचे स्थळ सुचविले होते. मेहरुणच्या हनुमाननगर येथे उद्या (ता. १३) मुलाकडे लग्न लागणार असल्याने मुलीच्या आई-वडिलांसह मध्यस्थी करणारे चव्हाण दांपत्यही जळगावात आले होते. आज दुपारी पुरणपोळ्यांची मेजवानी आटोपल्यावर मुलीच्या आईने उर्वरित पैशांची मागणी भागवत पाटील यांच्या कुटुंबीयांकडे केली. मात्र, दुपारी अडीचच्या सुमारास नवरी मुलगी आजारी भावासाठी उसाचा रस घेण्याच्या बहाण्याने घरातून निसटली. सायंकाळपर्यंत शोध घेऊनही नवरी सापडत नसल्याने अखेर तिच्या आई-वडिलांना जाब विचारण्यावरून वाद उफाळला. हा वाद थेट पोलिस ठाण्यात पोचला. त्या ठिकाणी मुलीच्या आई-वडिलांनी घेतलेले पैसे परत करण्याचे लेखी दिल्याचे समजते.

गल्लीत मंडप, डीजे तयार..!
मुलाच्या लग्नासाठी पाटील कुटुंबीयांनी जय्यत तयारी केली होती. गल्लीत मंडप टाकला गेला. नवरीचा साज, मंगळसूत्र आणि इतर तयारीही पूर्णत्वास आली होती. मात्र, दुपारपासून नवरीच बेपत्ता झाल्याने तिची शोधाशोध सुरू झाली. सायंकाळी हळद लागण्याची वेळ झाल्याने ठरविलेल्या वेळेतच डीजेची गाडीही वाजविण्यासाठी दारावर येऊन ठाकली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com