आरोपी भैलुमे व भवाळला शेताजवळून जाताना पाहिले 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 फेब्रुवारी 2017

नगर - कोपर्डी अत्याचार व खून खटल्यातील आरोपी नितीन भैलुमे व संतोष भवाळ दुचाकीवरून शेताजवळून जात असल्याचे पाहिल्याचे पीडित मुलीच्या चुलतआजीने आज न्यायालयात सांगितले. विशेष जिल्हा न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी सुरू आहे. यात आज मुलीच्या चुलतआजीची सरतपासणी व उलटतपासणी; तसेच छायाचित्रकाराची उलटतपासणी झाली. दरम्यान, सर्व पुरावे आधीच न्यायालयाच्या रजिस्टरवर घेण्याबाबत आरोपींच्या वकिलांनी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला. 

न्यायालयात सोमवारी (ता. 13) सादर करण्यात आलेली अश्‍लील छायाचित्रे व सीडी पुराव्यांच्या यादीत नसल्याचे सांगत आरोपींच्या वकिलांनी आक्षेप घेतला. सर्व पुरावे न्यायालयात रजिस्टरवर आणून त्याच्या सत्य प्रती आरोपींच्या वकिलांना मिळाव्यात, अशी मागणी केली. छायाचित्रे व सीडी असलेले पाकीट न्यायालयात सादर केल्याचे रजिस्टरमध्ये नमूद असल्याचे न्यायालयाने दाखवून दिले; तसेच हा अर्ज म्हणजे न्यायालयीन कामकाजावर अविश्‍वास दाखविण्यासारखे होईल, असे म्हणत न्यायालयाने आरोपींच्या वकिलांचा अर्ज फेटाळला. आरोपी नितीन भैलुमेला अभ्यासासाठी पुस्तकांच्या मागणी अर्जावरील निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला आहे. 

आरोपींच्या वकिलांनी आज छायाचित्रकाराची उलटतपासणी घेतली. पीडित मुलीच्या चुलतआजीची सरतपासणी व उलटतपासणी झाली. त्यात आजीने घटनेच्या दिवशीची हकिगत सांगितली. त्यांनी सांगितले, ""त्या दिवशी सायंकाळी साडेसात वाजता शेळी सोडून आणण्यासाठी शेतात गेले होते. शेताजवळून नितीन भैलुमे व संतोष भवाळ दुचाकीवरून जात असल्याचे दिसून आले. शेळी घेऊन घरी गेल्यानंतर रात्री आठ वाजता कामानिमित्त घराबाहेर आले असता, शेतातून रडण्याचा व ओरडण्याचा आवाज आला. धावत शेतात गेले. तेथे मुलीचा मृतदेह तिच्या आईच्या मांडीवर होता. आई रडत होती. तिला चक्‍कर आल्याने घरी नेण्यात आले. मुलीला उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले. मात्र डॉक्‍टरांनी मृत्यू झाल्याचे घोषित केले.''