कोपर्डी प्रकरणाची शिक्षा आता २९ नोव्हेंबरला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 नोव्हेंबर 2017

कोपर्डी येथील तुकाई लवण वस्ती परिसरात 13 जुलै 2016 रोजी सायंकाळी सात वाजता नववीत शिकाणारी शाळकरी पीडित मुलगी आजोबांच्या घरी मसाला आणण्यासाठी गेली होती. मसाला घेऊन ती पुन्हा घराकडे निघाली असता जितेंद्र शिंदे याने तिला रस्त्यात अडविले. त्यानंतर रस्त्याच्या बाजूला असलेल्या चारीत नेऊन तिच्यावर अत्याचार केला व त्यानंतर तिची निर्घृण हत्या केली. प्रतिकारात पीडितेचे दोन्ही होत मोडलेले होते

नगर - कोपर्डी येथे अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करुन खून करण्यात आल्याप्रकरणी अंतिम निकाल हा येत्या 29 नोव्हेंबर रोजी सुनाविला जाईल, अशी घोषणा न्यायालयाकडून आज (बुधवार) करण्यात आली. क्रौर्याची परिसीमा गाठण्यात आलेल्या या प्रकरणी जितेंद्र शिंदे (वय 25, रा. कोपर्डी, ता कर्जत), संतोष भवाळ (वय 30, मूळ रा. खांडवी, हल्ली रा. कोपर्डी) अणि नितीन भैलुमे (वय 26, रा. कोपर्डी) हे तिन्ही आरोपी दोषी असल्याचा निकाल न्यायालयाने याआधीच दिला आहे. मात्र आता आरोपींना सुनाविण्यात येणाऱ्या शिक्षेसंदर्भात उत्सुकता आहे. 

क्रौर्याची परिसीमा गाठण्यात आलेल्या या प्रकरणाचे संतप्त पडसाद राज्यभर उमटले होते. या पार्श्‍वभूमीवर देशभरातील माध्यमांनी दखल घेतलेल्या या निष्ठूर गुन्ह्यासंदर्भातील निकाल अत्यंत संवेदनशील मानण्यात येत आहे. या प्रकरणाची सुनावणी पूर्ण करुन आरोपी दोषी असल्याचा निकाल न्यायालयाने याआधीच दिला होता.मात्र दोषींना सुनाविण्यात येणाऱ्या शिक्षेची घोषणा आता 29 नोव्हेंबरला होणार आहे.

काय आहे कोपर्डी प्रकरण?

कोपर्डी येथील तुकाई लवण वस्ती परिसरात 13 जुलै 2016 रोजी सायंकाळी सात वाजता नववीत शिकाणारी शाळकरी पीडित मुलगी आजोबांच्या घरी मसाला आणण्यासाठी गेली होती. मसाला घेऊन ती पुन्हा घराकडे निघाली असता जितेंद्र शिंदे याने तिला रस्त्यात अडविले. त्यानंतर रस्त्याच्या बाजूला असलेल्या चारीत नेऊन तिच्यावर अत्याचार केला व त्यानंतर तिची निर्घृण हत्या केली. प्रतिकारात पीडितेचे दोन्ही होत मोडलेले होते. 

पीडितेच्या चुलत्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी घटनेच्या दुसऱ्या दिवशी आरोपी जितेंद्र शिंदे याला श्रीगोंदे येथून ताब्यात घेतले. त्यानंतर चार दिवसांनी संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे यांना अटक करण्यात आली.
 
न्यायालयाने तिन्ही आरोपींविरुद्ध कट रचून अत्याचार व खून केल्याचा आरोप ठेवला. या खटल्यात 31 साक्षीदार तपासण्यात आले. त्यात वैद्यकीय अधिकारी, पीडितेच्या मैत्रिणी, चुलत आजोबा यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. सरकार पक्षाने 24 परिस्थितीजन्य पुराव्याची साखळी न्यायालयात मांडली आणि ती सिद्ध केली. सरकार पक्षाचा युक्तिवाद आणि पुरावे ग्राह्य धरून विशेष जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी आरोपीला दोषी ठरविले. सरकार पक्षातर्फे राज्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी बाजू मांडली.

Web Title: kopardi rape case nagar news police