राजकीय आकसातून मला अडकवले - अशोक चव्हाण 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

मुंबई -  कुलाबा येथील आदर्श सोसायटीच्या गैरव्यवहारात मला राजकीय आकसातून जाणीवपूर्वक अडकवण्यात आले, असा आरोप माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या वतीने सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला. 

मुंबई -  कुलाबा येथील आदर्श सोसायटीच्या गैरव्यवहारात मला राजकीय आकसातून जाणीवपूर्वक अडकवण्यात आले, असा आरोप माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या वतीने सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला. 

आदर्श सोसायटीतील गैरव्यवहाराच्या फौजदारी खटल्यात चव्हाण यांना आरोपी करण्याची परवानगी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी सीबीआयला दिली आहे. त्याविरोधात चव्हाण यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्या. रणजित मोरे आणि न्या. साधना जाधव यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी झाली. चव्हाण यांच्याविरोधात खटला दाखल करण्यासाठी सीबीआयने 2013 मध्ये तत्कालीन राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्याकडे परवानगी मागितली होती; मात्र पुरेसे पुरावे नसल्याचे सांगत ही परवानगी नाकारण्यात आली होती. सीबीआयने गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात विद्यमान राज्यपालांकडे पुन्हा परवानगीसाठी अर्ज केला होता. तो राज्यपालांनी मंजूर केला आहे. एकाच प्रकरणात अशा प्रकारे दोन वेगवेगळे निर्णय होऊ शकत नाहीत. त्यामुळे राजकीय कारणांवरून चव्हाण यांना गोवण्यात आले, असा आरोप चव्हाण यांच्या वतीने ऍड. अमित देसाई यांनी केला. याचिकेवर मंगळवारी पुढील सुनावणी होणार आहे. चव्हाण यांनी पदाचा गैरवापर करून सोसायटीला परवानगी दिल्याचा आरोप सीबीआयने ठेवला आहे.