कर्जमाफी : चंद्रकांत पाटील उद्धव ठाकरेंच्या भेटीला जाणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 जून 2017

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे पुढील दोन दिवसांत मुंबईत येता आहेत. तेदेखील उद्धव ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता आहे.

मुंबई : महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आज शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीला मातोश्रीवर जाणार आहेत. शेतकरी आंदोलन, कर्जमाफी आणि मंत्र्यांच्या कामगिरीच्या अनुषंगाने ही भेट खूप महत्वपूर्ण मानली जात आहे.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची अंमलबजावणी योग्य पद्धतीने न झाल्यास शिवसेना सत्तेची पर्वा करणार नाही, असा थेट इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. पहिल्यांदा संपाची ठिणगी पेटवणाऱ्या शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी वेळ आली तर शिवसेना सत्तेची पर्वा करणार नाही असा इशारा दिला. दरम्यान शिवसेनेने घेतलेला आक्रमक पवित्रा आणि कर्जमाफी यासंदर्भात चंद्रकांत पाटील उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करणार आहेत.

विशेष म्हणजे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे पुढील दोन दिवसांत मुंबईत येता आहेत. तेदेखील उद्धव ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेनं सातत्यानं घेतलेली आक्रमक भूमिका लक्षात घेता बिघडलेले संबंध सुधारण्यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जाणार का, याबाबत उत्सुकता आहे.