विझताना दिवा फडफडतो, तसाच कॉंग्रेसचा विजय - दानवे

विझताना दिवा फडफडतो, तसाच कॉंग्रेसचा विजय -  दानवे

मुंबई - नांदेड महापालिका निवडणुकीत जनताजनार्दनाने दिलेल्या कौलाचा आम्ही सन्मानच करतो, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली. त्याच वेळी, कोणताही दिवा पूर्णपणे विझण्यापूर्वी थोडा तरी फडफडतोच, असे सांगत त्यांनी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या वक्तव्याचा समाचारही घेतला. 

परतीच्या पावसाचा संदर्भ घेत नांदेड महापालिकेतील विजय हा भाजपच्या परतीचा प्रवास सुरू करणारा आहे, या अशोक चव्हाण यांच्या वक्तव्याला दानवे यांनी प्रत्युत्तर दिले. नांदेडमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही आमचा विजय झाला नव्हता. गेल्या निवडणुकीत सुद्धा आमच्या दोनच जागा होत्या. त्या आता सहावर गेल्या. नांदेडमध्ये भाजपच्या मतांची टक्केवारी 3.81 वरून 24.64 टक्के इतकी झाली आहे, हेही विसरून चालणार नाही. आणखी पुढे जाण्यासाठी काय करता येईल, याचे चिंतन योग्य व्यासपीठावर होईलच, असेही दानवे यांनी म्हटले आहे. 

आजच राज्यातील इतर शहरांमधील पोटनिवडणुकांचेही निकाल लागले. मुंबई, कोल्हापूर, पुणे आणि नागपूर या चारही जागांवर भाजपचा विजय झाला आहे. अगदी अलीकडेच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतही भाजपने देदीप्यमान यश संपादन केले. या यशावर कितीही आरोळ्या उठविल्या जात असल्या, तरी त्याचे पुरावेही आम्ही लवकरच सादर करू. गेल्या दोन वर्षांतील महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निकालांचा जणू कॉंग्रेसला विसर पडला आहे, अशाच थाटात त्यांनी विधाने सुरू केली आहेत. संपूर्ण देशात भाजपला घवघवीत यश मिळत असतानाही एकट्या नांदेडच्या निकालाने कॉंग्रेसने हुरळून जाण्याची अजिबात गरज नाही. हा परतीचा पाऊस कोणाचा मॉन्सून संपविणार, हे आम्ही दाखवून देऊ, असेही दानवे यांनी म्हटले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com