आईला भेटण्यास मुलाने दिला नकार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 ऑक्टोबर 2017

मुंबई - जन्मदात्या आईला भेटण्यास मुलानेच नकार दिल्यामुळे त्याबाबतची एक याचिका मुंबई उच्च न्यायालयाने नामंजूर केली. दिवाळीत मुलाला भेटण्याची परवानगी आईने मागितली होती. मुलामध्ये निर्माण झालेला कडवटपणा दूर करण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञाची नियुक्ती करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले. 

पुण्यात राहणाऱ्या आणि पतीविरोधात घटस्फोटाचा दावा लढणाऱ्या महिलेने उच्च न्यायालयात याचिका केली आहे. त्यांचा मुलगा आता १३ वर्षांचा असून तो शाळेत शिकतो. घटस्फोटाचा दावा केल्यानंतर मुलगा अडीच वर्षांपासून वडिलांसोबत राहतो. पतीने केलेल्या घटस्फोटाच्या दाव्यात पत्नी मानसिक छळ करत असल्याचा आरोप केला आहे. मुलापासून दूर राहत असलेल्या आईने आता मुलाच्या शाळेच्या सुट्यांमध्ये आणि दिवाळीत त्याला भेटण्याची परवानगी उच्च न्यायालयाकडे याचिकेद्वारे मागितली आहे. याचिकेवर न्या. शालिनी फणसाळकर-जोशी यांच्यापुढे नुकतीच सुनावणी झाली. मुलाला आईला भेटू देण्यास वडिलांनी न्यायालयात विरोध केला होता. त्यामुळे न्यायालयाने मुलाची त्यांच्या दालनात भेट घेतली. मुलाने आईबद्दलची नाराजी स्पष्टपणे न्यायालयात मांडली आणि काही महत्त्वाच्या बाबीही स्पष्ट केल्या. आईला भेटण्याची इच्छा नसल्याचेही सांगितले. मुलाशी बोलल्यानंतर न्यायालयाने आईची याचिका नामंजूर केली.