गणरायाच्या आगमनाला वरुणराजाची हजेरी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 ऑगस्ट 2017

पुणे - शहरात गेल्या चार ते पाच दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने गणरायाच्या आगमनाच्या दिवशी पुन्हा जोर धरला. राज्याच्या बहुतांश भागांत हलक्‍या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. कोकणात काही ठिकाणी जोरदार, तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी येत्या रविवारी (ता. 27) मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. 

कोकणातील अनेक भागांत हवेचा दाब कमी झाल्याने ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर आणि मुंबईच्या उपनगरांत पावसाच्या हलक्‍या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसल्या. तसेच खोपोली, वळवण, भिरा, शिरगाव, डुंगरवाडी या घाटमाथ्यावरही पावसाने हजेरी लावली. त्यामुळे ओढे, नाले पुन्हा भरून  वाहू लागले असून, नद्याही दुथडी भरून वाहत आहेत. 

महाराष्ट्रात नाशिकमधील इगतपुरी, त्र्यंबकेश्‍वर, नगरमधील अकोले, नगर, पुणे जिल्ह्यातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, हवेली तालुक्‍यांतील काही ठिकाणी हलका पाऊस पडला. साताऱ्यातील महाबळेश्‍वर, वाई येथेही पावसाच्या हलक्‍या सरी बरसल्या. उर्वरित भागांत ढगाळ हवामान होते, तर सोलापूर, सांगली, कोल्हापूरच्या अनेक भागांत ढगाळ हवामान होते. काही ठिकाणी ऊन पडल्यामुळे हवामानात आर्द्रता वाढली होती. औसा, निलंगा, कंधार, औरंगाबाद, बीड, लातूर या जिल्ह्यांच्या काही भागांत अधूनमधून पावसाच्या सरी बरसल्या. 

विदर्भात अकोला जिल्ह्यातील अकोट येथे हलका पाऊस पडला, तर उर्वरित वाशीम, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांच्या अनेक भागांत ढगाळ हवामान होते. 

काही ठिकाणी हवेचा कमी दाबाचा पट्टा 
कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे येत्या मंगळवार (ता. 29) पर्यंत कोकणात काही ठिकाणी जोरदार, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. कोकणातील बहुतांश ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. मध्य महाराष्ट्र व विदर्भात बऱ्याच ठिकाणी, तर मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाच्या हलक्‍या सरी बरसण्याचा अंदाज हवामान विभागाच्या  सूत्रांनी वर्तविला.