विजांच्या कडकडाटासह पाऊस 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

पुणे - परतीचा पाऊस देशात रेंगाळल्याने यंदा अभ्यंगस्नानाच्या दिवशी शहर आणि परिसरात पावसाच्या सरी पडण्याची शक्‍यता हवामान खात्याने वर्तविली आहे. येत्या बुधवारी (ता. 11) उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक भागात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्‍त केला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, असा इशाराही हवामान खात्याने दिला आहे. 

पुणे - परतीचा पाऊस देशात रेंगाळल्याने यंदा अभ्यंगस्नानाच्या दिवशी शहर आणि परिसरात पावसाच्या सरी पडण्याची शक्‍यता हवामान खात्याने वर्तविली आहे. येत्या बुधवारी (ता. 11) उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक भागात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्‍त केला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, असा इशाराही हवामान खात्याने दिला आहे. 

शहर आणि परिसरात गेल्या चार दिवसांपासून पावसाच्या सरी पडत आहेत. परतीच्या मॉन्सूनमध्ये वातावरणात झालेल्या बदलाचा हा परिणाम आहे. हा प्रभाव दिवाळीपर्यंत कायम राहील. त्यामुळे दिवाळीच्या सुरवातीला पावसाची हजेरी लागेल, असेही हवामान तज्ज्ञांनी सांगितले. 

सध्या राज्यातील अनेक भागांत हवेचे दाब कमी झाले आहे. त्यामुळे मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. मराठवाडा व विदर्भात बहुतांश ठिकाणी तर कोकण, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार सरी कोसळत असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

कोकणात तुरळक ठिकाणी शुक्रवार (ता. 13) पर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी बुधवारी (ता. 11) जोरदार पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह पाऊस पडेल. येत्या शनिवारपर्यंत (ता. 14) कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

कमाल तापमानाचा पारा घसरला 
सध्या राज्यातील बहुतांश भागात ढगाळ हवामान आहे. त्यामुळे कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा खाली आला आहे. काही ठिकाणी अधूनमधून ऊन पडत आहे. मंगळवारी (ता. 10) मध्य महाराष्ट्रातील नेवासा, पुणे, मराठवाड्यातील सोयगाव, बनोटी येथे जोरदार पाऊस पडला. कोकणात व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी ढगाळ हवामान होते. मंगळवारी सकाळपर्यंत कोकणातील म्हापसा, म्हसळा, कानकोन, दापोली, मुरबाड अशा काही ठिकाणी हलका ते जोरदार पाऊस पडला. वाणगाव, भिवपुरी, खंद या घाटमाथ्यावरही हलका पाऊस पडला. 

मंगळूरपीर @ 90 
मध्य महाराष्ट्रातील पाथर्डी येथे सर्वाधिक 50 मिलिमीटर पाऊस पडला, तर नेवासा, आंबेगाव, घोडेगाव, सुरगाणा, बार्शी येथेही जोरदार पाऊस पडला. मराठवाड्यातील घनसांगवी, मुदखेड, वसमत येथे 70 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. उर्वरित अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडला. विदर्भातील मंगळूरपीर येथे 90 मिलिमीटर पाऊस पडला, तर बाभूळगाव, हिंगा, अकोट, अमरावती, बाळापूर, चिखली येथेही जोरदार पाऊस पडला.