आज महाराष्ट्र बंद; मराठा संघटनांचाही प्रतिसाद 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 जानेवारी 2018

बंदमध्ये सहभागी होणारे पक्ष आणि संघटना
डावी लोकशाही आघाडी जनता दल, सीपीआय, सीपीएम, जनता दल युनायटेड, भारीप बहुजन महासंघ

मुंबई : सणसवाडी हिंसाचार हाताळण्यास गृह विभागाने कसूर केली असून, पोलिसांनी या प्रकरणात अक्षम्य हेळसांड केल्याचा आरोप भारतीय बहुजन महासंघाचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी आज केला. तसेच या घटनेमागे शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे आणि हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे आणि मांजरीतील घुगे यांचे कारस्थान असल्याचा थेट आरोप डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. दरम्यान, डाव्या आणि दलित संघटनांनी आज (ता. 3) पुकारलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला मराठा संघटनांनीही प्रतिसाद दिला असून, या संघटनाही महाराष्ट्र बंदसाठी रस्त्यावर उतरणार आहेत. 

सणसवाडी येथील हिंसाचारात राहुल फटांगडे या तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी उत्स्फूर्तपणे लोक रस्त्यावर येऊ लागल्याचे चित्र निर्माण झाले होते. त्याचा मुंबईतील रेल्वे आणि रस्त्यावरील वाहतुकीवर परिणाम झाला. आंदोलकांनी रास्ता रोको केल्याने सकाळी अकराच्या सुमारास विस्कळित झालेली हार्बर रेल्वे पूर्वपदावर येण्यासाठी संध्याकाळ झाली. पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. आंबेडकर यांनी भीमा कोरेगावच्या कार्यक्रमाला अखिल भारतीय ब्राह्मण सभा, समस्त हिंदू आघाडी आणि पेशव्यांच्या वारसांनी याला विरोध दर्शविला होता याकडे लक्ष वेधले.

शिवराज प्रतिष्ठान आणि हिंदू एकता आघाडी यांनी स्वत:च्या कार्यकर्त्यांना दगडफेक करायला लावली आणि गाड्या जाळल्या. कोरेगाव स्तंभाकडे येणाऱ्यांवर दगडफेक करण्यासाठी पद्धतशीर तयारी करण्यात आल्याची माहिती आंबडेकर यांनी या वेळी दिली. तसेच ज्या गावांनी दगडफेक करण्यात सहभाग घेतला, त्या कोरेगावपासून शिरूर आणि कोरेगाव, चाकणपर्यंच्या गावाचे सरकारी अनुदान दोन वर्षांसाठी बंद करण्यात यावे, अशी मागणीही आंबेडकर यांनी या वेळी केली. तसेच आजही चाकण शिक्रापूर रस्त्यावरील गावांमधून या लोकांनी आश्रय घेतला असल्याची माहिती त्यांनी या वेळी दिली. सणसवाडी येथे झालेल्या हिंसाचारामागे स्थानिक गावकरी आणि प्रशासन असल्याचे सांगत डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी यावर अधिक प्रकाश टाकला.

दरम्यान, उद्या होणाऱ्या संपामध्ये मराठा आंदोलनातील संघटनादेखील सहभागी होणार आहेत. संभाजी ब्रिगेडने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात दलित आणि मराठा समाजामध्ये वितुष्ट आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे कोणीही जातीयवादी हिंसक प्रचारप्रसार करू नये, तसेच वादग्रस्त मेसेज पाठवू नये, असे आवाहन केले आहे. मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव कॉ. नरसय्या आडम यांनी धर्मांध समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर जातीअंत संघर्ष समितीचे कॉ. सुबोध मोरे यांनी या हल्ल्यास जबाबदार असणाऱ्या संभाज भिडे व मिलिंद एकबोटे यांच्यावर अनुसूचित जाती-जमाती कायद्याच्या कलमान्वये अटक करण्याची मागणी केली आहे. उद्या होणाऱ्या बंदमध्ये स्टुडंट्‌स फेडरेशन ऑफ इंडियाचे (एसएफआय) विद्यार्थीही सहभागी होणार आहेत. धर्मांध शक्‍तींचा प्रतिकार करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन डीवायएफआय समितीने केले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या चार कार्यकर्त्यांनी मंत्रालयात मुख्यमंत्री कार्यालयासमोर घोषणा देण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना ताबडतोब ताब्यात घेतले. 

बंदमध्ये सहभागी होणारे पक्ष आणि संघटना 
डावी लोकशाही आघाडी जनता दल, सीपीआय, सीपीएम, जनता दल युनायटेड, भारीप बहुजन महासंघ 

Web Title: maharashtra news koregaon bhima Riot police prakash ambedkar